
अमेरिकेने काही दिवसांपूर्वी जगातील बहुतेक देशांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. अनेक देश हा कमी व्हावा यासाठी अमेरिकेसोबत करार करण्यास उत्सुक आहेत. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाला खास ऑफर दिली आहे. ही ऑफर ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. तसेच या ऑफरमुळे दोन्ही देशांमधील तणावही वाढला आहे. या ऑफरबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी दक्षिण कोरियावर 25 टक्के कर लावला आहे. हा कर 15 टक्के पर्यंत कमी करण्यास डोनाल्ड ट्रम्प तयार आहेत. या साठी डोनाल्ड ट्रम्प यांनी 350 अब्ज डॉलर्सची रोख रक्कम मागितली आहे. त्यानंतर दक्षिण कोरियाने ही रक्कम देण्यास नकार दिला आहे. कारण एवढी मोठी रक्कम दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असं दक्षिण कोरियाने म्हटलं आहे.
दोन्ही देशांमध्ये टॅरिफ कमी करण्याबाबत चर्चा झाली. अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या वस्तूंवरील शुल्क 25% वरून 15% पर्यंत कमी करण्याची तयारी दाखवली होती. यासाठी ट्रम्प यांनी कोरियाला अमेरिकन प्रकल्पांमध्ये $350 अब्ज गुंतवणूक करण्यास सांगितले होते, मात्र नंतर ट्रम्प यांनी ही रक्कम रोख स्वरुपात मागितली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार कराराची चर्चा मावळली आहे.
अमेरिकेच्या आ ऑफरवर बोलताना दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार वाई सुंग-लॅक यांनी, $350 अब्ज रोख रक्कम देणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही असं म्हटलं आहे. तसेच अध्यक्ष ली जे-म्युंग यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम देशाच्या अर्थव्यवस्थेला डबघाईला आणू शकते असं विधान केलं आहे. सध्या दक्षिण कोरियाकडे अंदाजे $410 अब्ज परकीय चलनाचा साठा आहे, मात्र या साठ्यातील बहुतेक रक्कम कमी झाल्यास अर्थव्यवस्था संकटात येऊ शकते. त्यामुळे दक्षिण कोरियाने अमेरिकेची ही ऑफर नाकारली आहे.