नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी खेळला शेवटचा सर्वात मोठा डाव, आता तरी यश येणार का?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आपल्याला नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी मोठी धडपड सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी आणखी एक मोठा डाव खेळला आहे. त्यामुळे यामध्ये तरी त्यांन यश येतं का हे बघावं लागणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आपल्याला नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी मोठी धडपड सुरू आहे. याच उद्देशातून त्यांनी आपणच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणल्याचा मोठा दावा केला होता. मात्र भारतानं ट्रम्प यांचा खोटेपणा उघड करत त्यांना तोंडावर पाडले. त्याचाच राग सध्या ते भारतावर काढत असून, भारतावर अमेरिकेनं तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम झाल्यास शांतीच्या नोबेल पुरस्कारावर आपला दावा अधिक मजबूत होऊ शकतो असं त्यांना वाटतं. मात्र त्या आघाडीवर देखील त्यांना यश आलेलं नाहीये.
त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेच्या नोबेलसाठी आपला शेवटचा डाव खेळला आहे. त्यासाठी ट्रम्प यांनी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात केली आहे. गाझा आणि इस्रायलमध्ये सुरू असलेलं युद्ध थाबवून नोबेल पुरस्कारासाठीचा आपला दावा अधिक मजबूत करायचा असा विचार सध्या ट्रम्प करत आहेत. आज ट्रम्प यांनी गाझा युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे, या बैठकीत गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या विरामाचा एक प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मान्य करताच तो हमासकडे पाठवला जाणार आहे. एक ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये गाझामध्ये सुरू असलेलं युद्ध थांबलं पाहिजे असा प्रयत्न आता ट्रम्प करत आहेत. कारण दहा ऑक्टोबर रोजी स्वीडन स्थित नोबेल संस्था यावर्षीचा शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा करणार आहे.
ट्रम्प यांना गाझाकडून एवढी अपेक्षा का?
ऑक्टोबर 2023 पासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे, या युद्धामध्ये आतापर्यंत 65 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपीयन आणि अरेबीयन देश या युद्धासाठी आता इस्रायला जबाबदार धरत आहेत. इस्रायलला अमरिकेचं थेट समर्थन मिळत आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बाहेर नुकतंच एक मोठं वक्तव्य केलं आहे. ट्रम्प यांनी जर गाझाचं युद्ध थांबवलं तर त्यांना शांततेचा नोबेल मिळू शकतो असं मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ट्रम्प यांची हे युद्ध थांबवण्याची धडपड सुरू झाली असून, यात तरी त्यांना यश मिळणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
