हे वेगळंच आहे… चेहरा भाड्याने देऊन 31000 रुपयांची कमाई, चीनमधून आला कमाईचा नवा ट्रेंड
चीनमध्ये 'चेहरा भाड्याने देण्याचा' नवा ट्रेंड वेगाने वाढत आहे. सामान्य लोक AI-आधारित शॉर्ट ड्रामा आणि जाहिरातींसाठी आपले चेहरे डिजिटल प्लॅटफॉर्मवर भाड्याने देत आहेत. यातून त्यांना महिन्याला 31,000 पर्यंत कमाई करता येत आहे. अस्सल मानवी चेहऱ्यांची वाढती मागणी यामागे मुख्य कारण असून, यामुळे घरबसल्या पैसे कमवण्याची अनोखी संधी निर्माण झाली आहे.

थोडा विचार करा… काहीच काम न करता तुम्हाला घर बसल्या कमाई करता आली तर? तुमच्या चेहऱ्यानेच तुम्हाला ही कमाई करून दिली तर? हा काही काल्पनिक विचार नाहीये, तर वास्तव आहे. आपल्या शेजारच्या देशात म्हणजे चीनमध्ये चेहरा भाड्याने देऊन कमाई केली जात आहे. चीनमध्ये असे डीजिटल प्लॅटफॉर्म वेगाने वाढत आहेत. AIद्वारे शॉर्ट ड्रामा, जाहिराती आणि गेम बनवले जात आहेत. त्यासाठी सामान्य नागरिकांच्या चेहऱ्याची आवश्यकता भासत आहे. विशेष म्हणजे सामान्य नागरिकही आपले चेहरे भाड्याने वापरण्याची परवानगी देत आहेत. त्यातून त्यांना चांगली मिळकत होत आहे. त्यामुळे चीनमधील चेहरा भाड्याने देण्याच्या ट्रेंडची जगभर चर्चा सुरू आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबतची बातमी दिली आहे. चेहरा भाड्याने देण्याचा करार आधी केवळ फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या गुप्त चॅट ग्रुप्सपर्यंतच मर्यादित होता. आता एप्रिल महिन्यापासून तो जाहीरपणे डीजिटल प्लॅटफॉर्म्सवर आला आहे. हे नवीन मार्केट तुमच्या चेहऱ्याला कमाईचं नवीन साधन म्हणून पुढे आणत आहे.
भाड्याने चेहरा देण्याची प्रक्रिया काय?
लोक फेस लायसेंसिंग प्लॅटफॉर्म्सवर स्वत:ला रजिस्टर करतात
त्यानंतर आपल्या ओळखीचं (आयडेंटिफिकेशन) व्हेरिफिकेशन पूर्ण करतात
त्यानंतर एक डिजीटल एक्टर प्रोफाइल तयार करतात
नंतर, प्रोड्यूसर्स या प्रोफाइल्सला ब्राऊज करतात आणि आपल्या AI-जनरेटेड मनपसंत कॅरेक्टरसाठी चेहरा निवडतात. त्याबदल्यात तुम्हाला पैसे देतात.
शेनजेनची कंपनी ‘युआनजियांग शिनशेंग’ हा एक असाच प्लॅटफॉर्म आहे. तो मेमध्ये लॉन्च करण्यात आला होता. हा प्लॅटफॉर्म यूजर्सला रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशननंतर आपली डीजिटल प्रोफाइल बनवण्याची सुविधा देतो.
ही संपूर्ण संकल्पना चीनमध्ये वेगाने वाढत असलेल्या AI-जनरेटेड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी संबंधित आहे. चीनमध्ये एआयचा वापर शॉर्ट ड्रामाला वेगाने वाढवण्यासाठी आणि स्वस्तात बनवण्यासाठी केला जात आहे. या ठिकाणी प्रोड्युसर्स एआयने बनलेले कॅरेक्टर्स, स्क्रिप्ट आणि व्हिडिओसोबत नवीन प्रयोग करत आहेत. अशावेळी एक प्रश्न निर्माण होतो. एआय सर्व काही स्वत: बनवू शकतो तर खऱ्याखुऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यासाठी पैसे का दिले जात आहेत?
कमाई किती?
याचं उत्तर प्रत्येक प्लॅटफॉर्म आणि यूजर्सच्या हिशोबाने वेगवेगळं आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, बँकत काम करणाऱ्या एका व्यक्तीने केवळ तीन महिन्यातच सुमारे 2,500 युआन (सुमारे 370 डॉलर म्हणजे 31,000 रुपये) कमावले आहेत. एका जाहिरात कंपनीने त्यांचे सात वेळा पोट्रेट वापरले. त्याची त्यांना ही मिळकत झाली.
तर काही इतर प्लॅटफॉर्मवर कमाईचा आकडा कमी आहे. रेस्ट ऑफ वर्ल्डच्या रिपोर्टनुसार, शेनजेन स्थित ActID प्लॅटफॉर्म लोकांना प्रति एपिसोड 99 ते 500 युआन म्हणजे सुमारे 15 ते 74 डॉलर देत आहे. या कंपनीचे सुमारे 800 यूजर्स रजिस्टर्ड आहेत. यात 300 हून अधिक नागरिकांनी AI प्रोडक्शनला आपल्या चेहऱ्याचं लायसन्स दिलं आहे. म्हणजे आपला चेहरा भाड्याने वापरण्याची परवानगी दिली आहे. तर काही कंपन्यांनी चेहरा वापरण्यासाठी 7 ते 15,000 डॉलर (सुमारे 12.5 लाख रुपये) मोजले आहेत. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मला तुमचा चेहरा वापरण्याचं लायसन्स दिलं यावरही तुमची कमाई अवलंबून आहे.
खऱ्या चेहऱ्याची गरज का?
एआय काल्पनिक चेहरे तयार करू शकतो. पण प्रोड्यूसर्सला काही खास हवं आहे. त्यांना सर्वात वेगळ्या चेहऱ्याची गरज आहे. हा चेहरा वेगळा असेल, ओळखीचा असेल आणि खऱ्याखुऱ्या माणसाचा असेल. आम्हाला असली आणि आकर्षक चेहऱ्याची गरज असते. बुजुर्गांच्या विशिष्ट चेहऱ्याचीही आवश्यकता असते. एआयमधून बनवलेले चेहरे ड्रामासाठी एक सोर्स मटेरियल म्हणून ठिक आहे. पण त्यात जिवंतपणा नसतो. त्यामुळेच आम्ही असली चेहरे भाड्याने घेतो, असं ‘ActID’चे चीफ मार्केटिंग ऑफिसरने सागितलं.
