कॉमेडी मूव्ही बनवा आता…पाकिस्तानात सुरुये Flydubai घटनेची मस्करी, भर कार्यक्रमात भारताची उडवली खिल्ली
Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघाताच्या प्रयत्नाने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. मात्र, एका माजी पाकिस्तानी राजदूताने या घटनेची मस्करी केली आहे.

Flydubai Flight: फ्लायदुबई विमान अपघाताच्या प्रयत्नाने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. संपूर्ण जग या घटनेची तुलना अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्यांशी करत आहे. मात्र, एका माजी पाकिस्तानी राजदूताने या घटनेची मस्करी केली आहे. त्यांनी भर कार्यक्रमात जे म्हटलं आहे त्यानंतर एकच संतापाची लाट उसळली आहे.
बासित यांनी २०१४ ते २०१७ या काळात भारतात राजदूत म्हणून काम केले. अब्दुल बासित पाकिस्तानी वृत्तवाहिनी ‘एबीएन न्यूज’वर तज्ज्ञ म्हणून आले होते. वाहिनीच्या निवेदकाने विचारले, “बासित सर, फ्लायदुबई विमान हायजॅक करण्याचा खरोखरच प्रयत्न झाला होता, की हे काही वेगळेच प्रकरण आहे? हा प्रश्न ऐकून बासित मनमोहकपणे हसले. मग ते म्हणाले… अरे, हे तर खूपच छान आहे… मग, काही क्षणांच्या शांततेनंतर ते म्हणाले, “यावर एक कॉमेडी चित्रपट बनवला पाहिजे कारण…” पण यावेळी अब्दुल बासित खळखळून हसले. मग त्यांनी कसंबसं आपलं हसू आवरले आणि म्हणाले, “कारण या तथाकथित दहशतवादी कारवाईदरम्यान ज्या घटना घडल्या, त्यावर एक कॉमेडी चित्रपट बनवला पाहिजे. कारण या संपूर्ण घटनेतच भरपूर विनोद आहे.”
यावर, बासित तोंडी म्हणाले, “देवाचे आभार, यात कोणतीही शोकांतिका घडली नाही, पण हे सगळं…” पण पुन्हा एकदा, बासित खळखळून हसले. मग, स्वतःला सावरत ते म्हणाले, “ज्या प्रकारे इस्रायलने हे सादर केलं, ज्या प्रकारे भारत सादर करत आहे, ते अधिक विनोदी वाटतंय.” सीएनएन आणि इतर प्रमुख वाहिन्यासुद्धा आता इस्रायल आणि भारतासोबत सुरू असलेल्या चर्चेला आव्हान देत आहेत.
दरम्यान भारतीय वैमानिकावर ओमानी वैमानिकाने अचानकपणे हल्ला केला. विमान खाली कोसळू लागले होते पण भारतीय वैमानिकाच्या हुशारीने अनेक लोकांचे प्राण वाचले. स्वत: वर हल्ला होत असतानाही विमानाचा कंट्रोल सोडला नाही आणि नंतर काही क्रू सदस्यांनी विमानावर कंट्रोल घेत, ते सौदी अरेबियामध्ये उतरवले आणि भारतीय वैमानिक स्मिथ माछरला तातडीने रुग्णालयात दाखल केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत आहे. स्मिथच्या शौर्याचे कौतुक इस्त्रायलचे पंतप्रधान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. तर भारतीय वैमानिकाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मोदी यांनी व्हिडिओ कोलद्वारे संवादही साधला.
