तुम्हाला जिवंत पाहून बरं वाटलं… पुतीन डोनाल्ड ट्रम्प यांना असं का म्हणाले?
संपूर्ण जगात सध्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीची चर्चा आहे. या दोन नेत्यांची भेट झाली तेव्हा दोघांमधील संवाद मैत्रीपूर्ण होता याबाबत माहिती जाणून घेऊयात.

संपूर्ण जगात सध्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीची चर्चा आहे. दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. रशिया आणि अमेरिका हे दोन देश एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जातात. मात्र या दोन नेत्यांची भेट झाली तेव्हा दोघांमधील संवाद मैत्रीपूर्ण होता. विमानातून उतरल्यानंतर पुतीन यांनी ट्रम्प यांच्याशी हस्तांदोलन केले आणि ‘गुड आफ्टरनून, तुम्हाला निरोगी आणि जिवंत पाहून खूप आनंद झाला’ असं विधान केले. यानंतर आता पुतीन असे काम म्हणाले याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेत निवडणूकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. एका व्यक्तीने ट्रम्प यांच्या दिशेने गोळीबार केला होता. यात ट्रम्प हे किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे पुतीन यांनी ट्रम्प यांना भेटताच त्यांची विचारपूस केली असल्याचे समोर आले आहे. या भेटीनंतर पुतीन म्हणाले की, ‘आमची चर्चा रचनात्मक आणि आदरयुक्त वातावरणात झाली. मला अलास्काला बोलावले त्याबद्दल मी ट्रम्प यांचे आभार मानतो. आमचे देश वेगळे आहेत, आम्ही एकमेकांपासून खूप वेगळे आहोत, परंतु जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा सकारात्मक चर्चा होत असते.’
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे तब्बल 10 वर्षांनंतर अमेरिकेला गेले होते. सर्वप्रथम ट्रम्प आणि पुतीन यांची विमानतळावर भेटले. दोघांनी हस्तांदोलन केले आणि नंतर’द बीस्ट’ नावाच्या कारमधून नियोजित ठिकाणी रवाना झाले. पुतीन हे रशियन ताफ्यासोबत प्रवास करणार होते, मात्र ऐनवेळी ते ‘द बीस्ट’ या करामध्ये बसले.
युद्धबंदीबाबत निर्णय नाही
डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्यात सुमारे 3 तास चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे कौतुक केले. मात्र या बैठकीत कोणताही करार झाला नाही. तसेच रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धबंदीबाबत या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित होते, मात्र याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आता युद्ध थांबवण्याची भाषा करणाऱ्या ट्र्म्प यांच्यावर सडकून टीका होताना दिसत आहे.
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असते तर युद्ध झाले नसते – पुतीन
युक्रेनसोबतच्या युद्धाबाबत बोलताना पुतीन म्हणाले की, जर 2022 मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते तर युक्रेनसोबत युद्ध सुरू झाले नसते. अमेरिका आणि रशियामधील मागील काळ कठीण होता, मात्र आता परिस्थिती सुधारणे खूप गरजेचे आहे. त्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
