परदेशातून फंडिंग… भारताचा नेपाळ-बांगलादेश बनवण्याचा डाव; हरिश साळवे यांचा सीजेपीवर खळबळजनक आरोप
प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ हरीश साळवे यांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि अभिजीत दीपके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, CJP ला देशात आंदोलन करण्यासाठी परदेशातून आर्थिक मदत मिळत आहे, ज्यामागे विदेशी शक्तींचा भारताला अस्थिर करण्याचा डाव आहे. नेपाळ, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न असून, मोदी सरकारला हटवून स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना सत्तेत आणण्याचा हा कट आहे, असे साळवे यांनी म्हटले आहे.

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वातील कॉकरोच जनता पार्टीला घाम फोडणारा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप कोण्या राजकीय नेत्याने केला नाही तर देशातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांनी केला आहे. सीजेपीला देशात आंदोलन करण्यासाठी परदेशातून फंडिंग होत आहे. यामागे विदेशी शक्ती आहे. भारतात बांगलादेश आणि नेपाळसारखं वातावरण करण्याचा डाव आहे, असा खळबळजनक आरोप हरिश साळवे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हरिश साळवे हे लंडनमध्ये आहेत. त्यांनी तिथून प्रतिक्रिया दिली आहे. बाहेरून फंडिंग घेऊन हे आंदोलन होत आहे. विदेशी फंडिंगवरच हे आंदोलन सुरू आहे, हा माझा आरोप आहे. बाहेरचे लोक यांना चालवत आहेत, असा आरोप हरिश साळवे यांनी केला आहे.
बाहेरचे देश यामागे आहेत. अमेरिका भारतावर नाराज आहे. आपल्या वित्त मंत्र्यांनीही सांगितलंय की, सर्व फ्री ट्रेड अॅग्रीमेंट्स होत आहेत. कॅनडासोबतची चर्चा सुरू आहे. अमेरिकेसोबतची चर्चा एका स्तरावर येऊन थांबल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं आहे, असं साळवे म्हणाले.
नेपाळ, श्रीलंकेत कुणी गडबड केली?
नेपाळमध्ये कोणी गडबड केली हे सर्वांना माहीत आहे. त्यात संशयाला जागाच नाही. श्रीलंकेतही कुणी अराजकता माजवली सर्वांना माहीत आहे. बांगलादेशात काय झालं हेही माहीत आहे. शेख हसीना यांना हटवून आपला पंतप्रधान बसवण्यात आला. हे सर्व कोणी केलं? हे सर्व बाहेरच्या शक्ती करत आहेत. याच पद्धतीची परिस्थिती सध्या भारतात करायची आहे, असा दावा साळवे यांनी केला.
दीपके कोण आहेत?
सीजेपीच्या नेत्यांबद्दलही हरिश साळवे यांनी सवाल केला. दीपके कोण आहेत? सौरव दास कोण आहे? हे एक युट्यूबर आहेत. हे सर्व लोक कुठून आले? जर्मन नॅशनल आहेत. अचानक बाहेरचे लोक नेते बनले आहेत. त्यांना एवढा पैसा कुठून मिळत आहे? आज मोदी सरकावर फोकस ठेवण्यात आला आहे, याबाबत मला काही शंका नाहीये. मोदी सरकार झुकत नाही तर त्यांना हटवलं पाहिजे, असं यांना वाटतं. आपले दोस्त असणाऱ्या लोकांना त्यांना सत्तेत बसवायचं आहे. याबाबत मला काहीच शंका नाहीये. गेल्या 6-8 महिन्यांपासून मला एक क्लिअर पॅटर्न दिसत आहे. मला वाटतं आता सरकारने यांच्याशी डील करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
हरिश साळवे हे प्रसिद्ध वकील आहेत. 1999 ते 2002 पर्यंत ते भारताचे सॉलिसिटर जनरल होते. पाकिस्तानने चुकीच्या पद्धतीने पकडलेले माजी नेव्ही ऑफिसर कुलभूषण जाधव यांची केस ते आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढत आहेत. व्होडोफोन टॅक्स सारख्या असंख्य केसेसमध्येही ते सामील होते. 2015मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
