World News: युक्रेनला टॉमहॉक मिसाईल दिल्यास… पुतीन यांचा ट्रम्प यांना सर्वात मोठा इशारा
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या युद्धावरून रशियाने अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीला दोन महिने झाले आहेत, मात्र रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता करार झालेला नाही. अशातच आता दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
युक्रेनला टॉमहॉक क्षेपणास्त्रे देण्याचा अमेरिकेचा विचार
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी गेल्या महिन्यात अमेरिका युक्रेन रशियात आतपर्यंत हल्ले करण्यासाठी लांब पल्ल्याची टॉमहॉक क्षेपणास्त्रे देण्याचा विचार करत आहे, मात्र यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबत अंतिम निर्णय हे डोनाल्ड ट्रम्प हे घेणार आहेत. व्हान्स यांच्या या विधानानंतर रशियाची चिंता वाढली आहे. आता रशियाने अमेरिकेच्या या भूमिकेवर भाष्य केले आहे.
टॉमहॉक मिसाईल बाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे. पुतीन म्हणाले की, ‘जर अमेरिकेने युक्रेनला टॉमहॉक मिसाईल दिल्या तर याचा अर्थ रशियाच्या आतमध्ये हल्ल्यांना परवानगी मिळेल. यामुळे रशिया आणि अमेरिकेतली संबंध पूर्णपणे नष्ट होतील. त्यामुळे आता अमेरिकेला आपल्या या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला कागदी वाघ म्हणत ते युक्रेनवर विजय मिळवण्यात अयशस्वी झाल्याचे म्हटले होते. पुतीन यांनी याला प्रत्युत्तर देताना नाटो स्वतःच कागदी वाघ असून ते रशियाची प्रगती रोखण्यात अयशस्वी झाल्याचे म्हटले होते. तसेच रशिया युद्धात आघाडी घेत आहे असंही रशियाने म्हटले होते. त्यानंतर आता दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.
दरम्यान, रशियन तेल खरेदी करुन भारत आणि चीन या युद्धाला खतपाणी घालत असल्याचाही आरोप अमेरिकेने केला होता. तसेच भारताने रशियन तेल खरेदी करु नये असंही म्हटलं होतं. मात्र भारताने अमेरिकेच्या धमकीला भीक न घालता तेलाची खरेदी सुरु ठेवली आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणलेले आहेत.
