तो तुरुंगातच मरेल… इम्रान खानसाठी थेट…; पाकिस्तान झुकणार?
इम्रान खान यांची तुरुंगात प्रकृती बिघडल्याने चिंता वाढली आहे. 7 ऑस्ट्रेलियन माजी कर्णधारांनी मानवतावादी भूमिकेतून त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कुटुंबाने केला असून, तुरुंगातच मृत्यू होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे पाकिस्तान सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इम्रान खान गेल्या तीन वर्षापासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. इम्रान खान यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. इम्रान खान यांना तुरुंगातून सोडण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सात माजी कर्णधारांनी परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. ग्रेग चॅपल, इयान चॅपल, एलन बॉर्डर, किम ह्युजेस, मार्क टेलर, स्टिव्ह वॉ आणि बेलिंडा क्लार्क यांनी वोंग यांना पत्र पाठवून इम्रान खान यांना तुरुंगात डांबल्याबद्दल आणि त्यांच्याशी करण्यात येत असलेल्या व्यवहाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
इम्रान खान 2023 पासून रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात आहेत. त्यांच्या तब्येतीच्या बातम्याही अधूनमधून येत आहेत. इम्रान यांची दृष्टी कमकुवत झाली आहे. त्यांच्यावर योग्य उपचार केले जात नसल्याचा इम्रान खान यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या क्रिकेट जगतातील जुन्या सहकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
दिग्गजांचा पाठिंबा
ऑस्ट्रेलियाच्या सात माजी कर्णधारांनी इम्रान यांच्या सुटकेची मागणी केली आहे. आमची मागणी राजकीय नाहीये. आम्ही मानवतेच्या आधारे ही मागणी करत आहोत, असं या कर्णधारांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी 2022मध्ये इस्लामाबादमध्ये ग्रेग चॅपल आणि इम्रान खान यांच्या झालेल्या भेटीचंही स्मरण केलं. त्यावेळी इम्रान खान यांची प्रकृती ठणठणीत होती, असं चॅपल यांनी म्हटलंय.
अपीलमध्ये काय म्हटलंय?
ग्रेग चॅपल यांनी इम्रान खान यांना शेवटचं 2022मध्ये इस्लामाबादमध्ये पाहिलं होतं. तेव्हा ते पंतप्रधान होते. ते पूर्णपणे स्वस्थ आणि धडधाकट होते. त्यांची ती प्रतिमा आणि तुरुंगातील त्यांचे होणारे हाल याचा ताळमेळ लावणं कठीण झालंय. त्यामुळेच आम्ही पत्र लिहित आहोत. आम्ही राजकारण किंवा राजकीय व्यक्ती म्हणून लिहित नाहीये. आम्ही ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार या नात्याने लिहित आहोत. आम्हाला आमचं म्हणणं मांडावसं वाटलं म्हणून आम्ही लिहित आहोत, असं या अपीलमध्ये म्हटलं आहे.
या चिठ्ठीत इम्रान खान यांच्या क्रिकेट जगतातील विक्रम आणि त्यांच्या मानवतावादी कामांचाही उल्लेख केला आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्त्वातच पाकिस्तानने आपला एकमेव वर्ल्ड कप जिंकला होता. त्यांनी पंतप्रधान म्हणून आपल्या देशाचं नेतृत्व केलं. ऑस्ट्रेलियन नागरिक त्यांच्याकडे आदराने पाहतात. एक नेता आणि कर्णधार म्हणून त्यांची त्यांचा अमिट ठसा उमटवलेला आहे. त्यांनी कॅन्सर रुग्णालय बनवून अनेक पाकिस्तानी नागरिकांचे प्राणही वाचवले आहेत, असं त्यात म्हटलं आहे.
त्यांचा मृत्यू तुरुंगात होईल
त्यांचा मृत्यू तुरुंगात होईल याची आम्हाला चिंता आहे, असं चॅपल म्हणाले. इम्रान खान यांच्या कुटुंबायांकडून जी माहिती मिळत आहे. ती चिंता करणारी आहे. इम्रान यांना औषध दिलं जात नाहीये. त्यांच्यावर उपचार होत नाहीये. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू दिलं जात नाहीये. त्यांना कायदेशीर मदतही दिली जात नाहीये, असंही या कर्णधारांनी म्हटलं आहे.
