दोन मुस्लिम देशांमधल्या दुश्मनीचा भारताने उचलला अचूक फायदा, हवेत उडणाऱ्या पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम
सध्या आखातामधील दोन बड्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये शत्रुत्व निर्माण झालं आहे. त्याचा भारताने अचूक फायदा उचलला आहे. महत्वाचं म्हणजे त्या देशाचे प्रमुखच खास दोन तासांसाठी भारतात आले होते. ही रणनिती हवेत उडणाऱ्या पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम करेल.

पाकिस्तानी मीडियामध्ये दोन मोठ्या बातम्या सुरु आहेत. एक म्हणजे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ बोलतायत की, सौदी अरेबियासोबतच्या संरक्षण कराराचा विस्तार केला जाईल. दोन्ही देश मिळून या बद्दल निर्णय घेतील. दुसरी बातमी ही आहे की, भारत-यूएईने सोमवारी तीन अब्ज डॉलरची LNG डील साइन केली. संरक्षण आणि व्यापारी संबंध अधिक व्यापक करण्यावर एकमत झालं. भारत-पाकिस्तानमध्ये शत्रुत्व आहेच. पण आखातामधील दोन देश आता परस्परांचे कट्टर हाडवैरी बनले आहेत. एकीकडे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया आपले संबंध बळकट करत आहेत. दुसरीकडे भारत-यूएई संबंध सुद्धा वेगाने विस्तारत आहेत. याचं ताजं उदहारण आहे, यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल-नाहयान यांचा दोन तासांचा विशेष भारत दौरा. अल-नाहयान सोमवारी दोन तासांसाठी भारत दौऱ्यावर आले होते. तिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा केली.
भारत आणि यूएईमधील व्यापार आणि संरक्षण संबंध बळकट करण्यासाठी सोमवारी भारताने यूएईकडून 3 अब्ज डॉलरचा LNG खरेदी करण्याचा करार केला. या डीलसोबतच भारत यूएईचा सर्वात मोठा ग्राहक बनला आहे. दोन्ही नेत्यांनी पुढच्या सहावर्षात द्विपक्षीय व्यापार 200 अब्ज डॉलरपर्यंत दुप्पट करण्याचा आणि एक रणनितीक संरक्षण भागीदारी बनवण्याचा संकल्प केला. करारानुसार अबू धाबीची सरकारी कंपनी एडीएनओसी गॅस पुढची 10 वर्ष भारताच्या हिंदुस्तान पेट्रोलियमला दरवर्षी 5 लाख मेट्रिक टन LNG चा पुरवठा करेल. या करारानंतर एडीएनओसीचा भारतासोबतचा एकूण करार 20 अब्ज डॉलरपेक्षा अधिकचा झाला आहे.
आघाडी अजून बळकट करण्याची गरज
सौदी अरेबिया आणि यूएईमधील वाढत्या संघर्षामुळे एक नवीन समीकरण आकाराला येत आहे. यावर अमेरिकेतली बोस्टनचे नॉर्थ ईस्टर्न यूनिवर्सिटीचे प्रोफेसर आणि अंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञ मॅक्स अब्राहम्स यांनी एक्सवर लिहिलय की, पाकिस्तान-तुर्की-सौदी अरेबियाच्या आघाडीला टक्कर देण्यासाठी भारत-इस्रायल-यूएईला आपली आघाडी अजून बळकट करावी लागेल.
लेटर ऑफ इंटेंटवर स्वाक्षरीचा अर्थ काय?
यूएईसोबत लेटर ऑफ इंटेंटवर स्वाक्षरी करण्याचा असा अर्थ होत नाही की, भारत कुठल्या क्षेत्रीय संघर्षात सहभागी होईल असं परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, “कुठल्याही क्षेत्रीय देशासोबत संरक्षण आणि सुरक्षा आघाडीवर सहकार्याचा अर्थ असा होत नाही की, आम्ही त्या संघर्षात कुठल्या खास पद्धतीने सहभागी होणार आहोत”
भारत-यूएईच्य घनिष्ठ संबंधांमुळे पाकिस्तानची चिंता वाढत चालली आहे. कदाचित उद्या भारत-यूएईमिळून आपल्यासमोर आव्हान निर्माण करतील अशी भिती पाकिस्तानच्या मनात आहे. तेच भारताच्या साथीने यूएई सौदीचा हिशोब चुकता करत आहे. त्यामुळे भारत-यूएईचा व्यापारी आणि रणनितीक दोन्ही आघाड्यांवर फायदा होत आहे.
