निमिषा प्रियासाठी भारत एकवटला! हालचालींना वेग, दिनेश नायर यांचा पुढाकार
निमिषा प्रियाला खरच फाशी होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत.

येमेनमधील तुरुंगात 2017 पासून बंदिस्त असलेल्या केरळमधील पालक्कड येथील 37 वर्षीय नर्स निमिषा प्रियाच्या सुटकेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. निमिषा प्रियावर तिच्या येमेनी व्यवसाय भागीदाराच्या कथित खुनाचा आरोप आहे आणि तिची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. तरीही, ब्लड मनी देऊन तिच्या शिक्षेत सवलत मिळण्याची आशा अजूनही कायम आहे. यासाठी येमेनमध्ये एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्याचे नेतृत्व प्रसिद्ध सूफी विद्वान शेख हबीब उमर करत आहेत. या बैठकीत येमेन सरकारचे प्रतिनिधी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि मृत व्यक्तीचा भाऊ तलाल यांचा समावेश आहे.
निमिषा प्रिया इंटरनॅशनल अॅक्शन काउसिलिंगचे प्रयत्न
निमिषा प्रिया इंटरनॅशनल अॅक्शन काउसिंलिंगच्या विनंतीनंतर, कंठापुरम एपी अबूबक्कर मुस्लियार यांनी हस्तक्षेप करत येमेनमधील सरकारी प्रतिनिधींशी शेख हबीब उमर यांच्यामार्फत चर्चा घडवून आणली. या चर्चेत निमिषा प्रियाच्या शिक्षेची माफी आणि ब्लड मनीच्या बदल्यात शिक्षेत सवलत देण्याची मागणी पुढे करण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. निमिषा प्रियाच्या सुटकेसाठी बे म्हणून तलाल अब्दो मेहंदी यांच्या कुटुंबाला 10 लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे 8.6 कोटी रुपये) देण्याची ऑफर देण्यात आली आहे, परंतु कुटुंबाने ही ऑफर अद्याप स्वीकारलेली नाही, कारण त्यांच्यासाठी हा सन्मानाचा प्रश्न आहे.
दिनेश नायर यांचे योगदान
निमिषा प्रिया इंटरनॅशनल अॅक्शन काउसिलिंगचे मुख्य समिती सदस्य आणि वर्ल्ड मल्याळम काउसिलिंगचे जागतिक सचिव जनरल दिनेश नायर यांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच अथक प्रयत्न केले आहेत. त्यांनी सांगितले की, “येमेनच्या जटिल राजकीय परिस्थितीत निमिषा प्रियाच्या सुटकेसाठी ब्लडमनी देण्याचा हा एक व्यावहारिक दृष्टिकोन आहे. आम्हाला आशा आहे की हे प्रयत्न यशस्वी होतील आणि निमिषा प्रियाची सुटका होईल.”
त्यांनी पुढे नमूद केले की:
- निमिषा प्रियाच्या सुटकेसाठी अनेक व्यक्तींनी पुढाकार घेतला असून, बचाव निधीसाठी देणग्या देण्याचे आश्वासन दिले आहे.
- येमेनमधील जमातींच्या नेत्यांशी आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबियांशी चर्चा जलद गतीने सुरू आहे.
- मल्याळी समुदाय एकजुटीने निमिषा प्रियाच्या सुटकेसाठी पाठिंबा देईल, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.
- लिगल एड कमिटी ट्रस्टने निमिषा प्रियाच्या सुटकेसाठी मदत करण्याची तयारी दाखवली आहे. याशिवाय, अब्दुल रहीम यांच्या सुटकेसाठी जमा झालेली उर्वरित रक्कम निमिषा प्रियाच्या प्रकरणासाठी वापरण्याची योजना आहे.
भारत सरकारची भूमिका
भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, सध्याच्या राजनैतिक मर्यादांमुळे त्यांनी निमिषा प्रियाच्या सुटकेसाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न केले आहेत. अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी म्हटले, “ही दुर्दैवी परिस्थिती आहे… आम्ही जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत गेलो आहोत.” सरकारने मृत व्यक्तीच्या कुटुंबाशी रक्तपैशांसाठी चर्चा सुलभ करण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु कुटुंबाने ही ऑफर नाकारली आहे.
पुढील पावले
निमिषा प्रियाच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. येमेनमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेता, ब्लडमनी हा एकमेव व्यवहार्य पर्याय आहे. दिनेश नायर आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे, तसेच मल्याळम समुदाय आणि इतर समर्थकांच्या पाठिंब्यामुळे, निमिषा प्रियाच्या सुटकेची आशा अजूनही कायम आहे. या प्रकरणात येत्या काही दिवसांत सकारात्मक प्रगती होण्याची अपेक्षा आहे.
