
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क मोडवर काम करत आहेत. यामुळेच देशाच्या विविध भागांतून अटकसत्र सुरू आहे. राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेसाठी जासूसी केल्याच्या आरोपाखाली नवी दिल्लीतील नौसेना भवनातील अपर डिव्हिजन क्लर्क (यूडीसी) विशाल यादव याला अटक केली आहे. विशाल यादव याच्याकडून चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
पैशाच्या लालसेतून जासूसी
चौकशीत असे आढळले की, आरोपी विशाल यादव पैशाच्या लालसेतून पाकिस्तानी हँडलरला माहिती पुरवत होता. त्याने ऑपरेशन सिंदूरशी संबंधित माहितीही पाकिस्तानी हँडलरला दिली होती. याबदल्यात त्याला 50 हजार रुपये मिळाले होते. आतापर्यंत त्याच्या खात्यात 2 लाख रुपये जमा झाल्याचे तपासात उघड झाले आहे. अटकेनंतर हेर विशाल यादव याला जयपूर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला चार दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे.
वाचा: इराण- इस्त्रायल युद्ध संपले, पण 12 दिवसांमध्ये झालेल्या नुकसानाचा आकडा ऐकून बसेल धक्का!
पाकिस्तानी हँडलरशी फेसबुकवर झाली होती मैत्री
सीआयडी गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, विशाल यादव याची फेसबुकद्वारे पाकिस्तानी हँडलरशी मैत्री झाली होती. पाक हँडलरने प्रिया शर्मा बनून विशालला मैत्रीची रिक्वेस्ट पाठवली होती, त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. दोघांनी व्हॉट्सअॅप नंबर शेअर केले आणि नंतर टेलिग्रामचा वापर सुरू केला.
ऑपरेशन सिंदूरची माहितीही शेअर केली
विशाल आणि पाकिस्तानी हँडलर यांच्यात प्रिया शर्मा बनून अनेक महिने संवाद झाला. नंतर तिने आपले खरे नाव विशालला सांगितले आणि पैशाचे आमिष दाखवले, ज्यात तो अडकत गेला. आतापर्यंतच्या चौकशीत विशालने सांगितले की, माहिती देण्यासाठी त्याला प्रिया यांच्याकडून सुरुवातीला 5 ते 6 हजार रुपये मिळत होते. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यावर प्रियाने सांगितले की, तू दिलेली माहिती सी ग्रेडची आहे, जर चांगली माहिती दिलीस तर जास्त पैसे देईन. यानंतर विशालने ऑपरेशन सिंदूरदरम्यान नौसेना आणि इतर संरक्षणाशी संबंधित माहिती पाकिस्तानी महिला हँडलरला दिली. याबदल्यात त्याला एकदा 50 हजार रुपये मिळाले.
आरोपीला आतापर्यंत 2 लाख रुपये मिळाले
तपासात असे दिसून आले की, आरोपीने आतापर्यंत सुमारे दीड ते दोन लाख रुपये आपल्या खात्यात घेतले आहेत. काही रक्कम क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग खात्यात यूएसडीटीच्या स्वरूपातही घेतली होती. आरोपीच्या मोबाइलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले. यात पैशांचा व्यवहार, सामरिक माहिती आणि मोबाइल चॅट्स आढळले. यावरून उघड झाले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यानही आरोपीने नौसेना आणि इतर संरक्षणाशी संबंधित माहिती पाकिस्तानी महिला हँडलरला पुरवली होती.