इराणच्या बंकरमध्ये अशी गोष्ट ज्याचा अमेरिकेलाही धसका; तब्बल 400 किलो…नेमकं दडवलंय काय?
इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सध्या थांबलं आहे. पण इराणने 400 किलो युरेनियम नेमकं कुठे ठेवलंय हे अद्याप कोणालाही समजलेलं नाही.

Iran And Israel War Update : अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीने इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबले आहे. या दोन्ही देशांत आता शस्त्रसंधी झाली आहे. हा करार होण्याआधी अमेरिकेने या युद्धात उडी घेत इराणच्या आण्किक तळांवर हवाई हल्ले केले होते. दरम्यान, शस्त्रसंधी झाली असली तरी इराणकडे असलेल्या 400 किलो युरेनियमने सर्वांच्याच चिंतेत भर टाकली आहे. अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हेन्स यांच्यामते इराणकडे असलेल्या 400 किलो युरेनियमचा हिशोब लागत नाहीये. हे युरेनियम नेमके कुठे आहे त्याचा शोध लागत नाहीये.
400 किलो युरेनियममध्ये नेमकी किती शक्ती?
जे डी व्हेन्स यांनी एबीसी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने इराणच्या वेगवेगळ्या आण्विक केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्ब टाकल्यानंतर आता या आण्विक केंद्रांमध्ये असलेल्या 400 किलो युरेनियमच्या भांडाराचा थांगपत्ता लागत नाहीये. या 400 किलो युरेनियमपासून तब्बल 10 आण्वस्त्रं तयार करता येऊ शकतात. हे 400 किलो युरेनियम साधारण 60 टक्के शुद्ध आहे. या युरेनियमपासून अण्वस्त्रं तयार करायचे असतील तर ते साधारण 90 टक्के शुद्ध असणं गरजेचं आहे.
इराणने हे युरेनियम एका अन्य ठिकाणी लपवले असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेसोबत अण्वस्त्रांबाबत चर्चा चालू झाल्यास इराण याच 400 किलो युरेनियमच्या मदतीने वेगवेगळ्या अटी ठेवण्याची शक्यता आहे.
16 ट्रक उभे असल्याचे दिसत होते
इस्रायलसोबत हल्ला होण्याआधीच भविष्यकाली धोका लक्षात घेता इराणने हे युरेनियम आणि अन्य महत्त्वाची उपकरणं गुप्त ठिकाणी लबवले होते, असे बोलले जाते. अमेरिकेने इराणवर जेव्हा हल्ला केला, त्याआधीच इराणच्या आण्विक केंद्रांचे काही सॅटेलाईट फोटो समोर आले होते. या फोटोंमध्ये फोर्डो या आण्विक केंद्राच्या परिसरात 16 ट्रक उभे असल्याचे दिसत होते. फोर्डो हे आण्विक केंद्र डोंगरांमध्ये उभारण्यात आलेले आहे. बहुसंख्य हल्ले या आण्विक केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही. अमेरिकेने हल्ला करण्याआधीच फोर्डो आण्विक केंद्रातून इराणने 400 किलो युरेनियम अन्य सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याचे बोलले जाते.
400 किलो युरेनियम नेमकं कुठे गेलं?
मात्र फोर्डो आण्विक केंद्राच्या समोर उभे असलेल्या 16 ट्रकमधून नेमकं काय नेण्यात आलं? या ट्रकमधून कशाची वाहतूक करण्यात आली? हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार फोर्डो आण्विक केंद्रातून युरेनियम स्टॉकपाईल आणि अन्य उपकरणं इराणची प्राचीन राजधानी इस्फहान इथं हलवण्यात आले असून ते एका अंडरग्राऊंड स्टोरेड साईटमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे सध्या युद्ध जरी थांबले असले तरी इराणचा अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम भविष्यातही चालूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
