Israel-Hamas War | 45 दिवसानंतर पहिली मोठी डील, हमास इस्रायलच्या 50 बंधकांना सोडणार, पण….
Israel-Hamas War | गाजा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. या युद्धाला सुरुवात झाल्यापासून युद्धविराम कधी होणार? याकडे सगळ्या जगाच लक्ष लागलं होतं. इस्रायलवर मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. अखेर आता एक महत्त्वपूर्ण निर्णय झालाय. आतापर्यंत हजारो नागरिक या युद्धात मारले गेले आहेत.

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु होऊन 40 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. अनेक निष्पाप नागरिक या युद्धात मारले जात आहेत. त्यामुळे युद्धबंदी कधी होणार? याकडे सगळ्या जगाच लक्ष आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आलीय. हमासच्या ताब्यात असलेल्या बंधकांच्या सुटकेसाठी दोन्ही बाजूमध्ये बोलणी सुरु होती. इस्रायलच्या वॉर कॅबिनेटने अखेर एका प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार, पुढचे चार ते पाच दिवस युद्धबंदी म्हणजे सीजफायर असेल. त्या बदल्यात हमास बंधकांची सुटका करणार आहे. हमास त्यांच्या ताब्यात असलेल्या बंधकांची गुरुवारपासून टप्याटप्याने सुटका करण्यास सुरुवात करेल. सुटका होणाऱ्या बंधकांमध्ये 20 महिला आणि 30 लहान मुलं आहेत.
इस्रायल सुद्धा पॅलेस्टाइनच्या 150 कैद्यांची सुटका करेल. बऱ्याच दिवसांपासून बंधकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु होते. अमेरिकेसह अरब देश इस्रायल-हमासमध्ये बंधकांच्या सुटकेसाठी डील घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत होते. आता 45 दिवसानंतर या प्रयत्नांना यश येताना दिसतय. इस्रायली मीडिया रिपोर्ट्सनुसार, वॉर कॅबिनेटने बंधकांच्या सुटकेसाठी युद्धविरामाच्या कराराला मंजुरी दिलीय.
हमासने पहिली अट काय ठेवली?
“इस्रायल आणि हमासमध्ये बंधकांच्या सुटकेचा करार आता खूप जवळ आला आहे” असं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले होते. कतारशी चर्चा झाल्याने बायडेन यांनी हा विश्वास व्यक्त केला होता. इस्रायल-हमासमध्ये कतार मध्यस्थाच्या भूमिकेत होता. तो थेट हमासच्या संपर्कात होता. बंधकांच्या सुटकेसाठी हमासकडून युद्धविरामाची पहिली अट ठेवण्यात आली, असं एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितलं.
हमासला काय हवय?
इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या पॅलेस्टाइन कैद्यांची सुटका. त्या बदल्यात हमास 50 बंधकांची सुटका करणार.
4 ते 5 दिवसांसाठी सीजफायर.
गाजामध्ये वैद्यकीय मदत पोहोचवणं.
जखमींवर योग्य उपचार.
हमास चीफ काय म्हणालेला?
21 नोव्हेंबरला हमास प्रमुख इस्माइल हनियेहच वक्तव्य समोर आलं होतं. त्याने युद्ध विरामाचा करार लवकरच होऊ शकतो, असं म्हटलं होतं. आम्ही कतारच्या मध्यस्थांना आमच उत्तर दिलय असं त्याने सांगितलं होतं.
