
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय पाहता त्यांचं डोकं फिरलं आहे का? असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम भारताच्या निर्यातीवर होणार आहे. भारतीय वस्तू अमेरिकेत महागड्या होणार आहे. त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी आपसूक घटणार आहे. त्यामुळे भारतानेही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पण अमेरिकेने भारताची कोंडी करण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अमेरिकेने भारतावर असाच राग काढल्याचा इतिहास आहे. पण त्याचं तेव्हा जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. हे प्रकरण 1963चं आहे आणि तेव्हापासून अमेरिकेच्या मनात भारताबाबत आकस आहे. भारताने त्यावेळेस अमेरिकेला दणका दिला होता. त्यामुळे नुकसान झालं होतं. तसेच अमेरिकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. नुकतंच याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी खुलासा केला.
एका मुलाखतीत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हंटलं होतं की, अमेरिकेने भारतासोबत 1965 पासून संरक्षण करार करणे बंद केले होते. 1965 ते 2006 दरम्यान एखाद दुसरा अपवाद वगळता भारताने एकही करार केलेला नाही. अमेरिकेच्या आकसामुळेच भारताला इतर पर्याय शोधावे लागले. भारताने माजी सोव्हिएत यूनियन आणि नंतर रशियासोबत संरक्षण कराराला प्राधान्य दिलं. त्यामुळे भारताची संरक्षण घडी पुन्हा बसली. अमेरिकेने आपल्या धोरणात 2005-2006 मध्ये बदल केला. पण भारताने या काळात रशियासोबतच नाही तर ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीसोबत संरक्षण करार केले. अमेरिकेने त्यानंतर भारताला नऊ सी-130 विमानं विकण्याचा प्रयत्न केला. पण भारताने ही ऑफर नाकारली. अमेरिकेने 1965 ते 2006 दरम्यान भारतासोबत एकही संरक्षण करार केला नाही.
1962 मध्ये भारत चीन युद्धानंतर भारताला एअर डिफेन्स सिस्टम मजबूत करायची होती. यासाठी भारताने अमेरिकेकडे एफ 104 खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. पण अमेरिकेने या कराराला नकार दिला. उलट पाकिस्तानला एफ 104 फुकट दिले. त्यामुळे भारताला अमेरिकेच्या मनात काय आहे ते कळलं. त्यामुळे भारताने रशियाकडे मोर्चा वळवला आणि त्यांच्याकडून मिग 21 लढाई विमान खरेदी केली. इतकंच काय तर तंत्रज्ञान देखील समजून घेतलं. त्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात 1965 ला युद्ध झालं. तेव्हा पाकिस्तानने अमेरिकेच्या एफ 104 विमानाचा वापर भारताविरुद्ध केला. पण या युद्धात भारताचे मिग 21 त्यापेक्षा सरस ठरले. त्यामुळे अमेरिकेला हा पराभव सहन झाला नाही.