JD Vance Home Attack : अमेरिका हादरली! थेट उपराष्ट्राध्यक्षांच्या घरावरच मोठा हल्ला, जगात खळबळ!
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्याचा आदेश दिला असून सध्या निकोलस हे तुरुंगात आहेत. दरम्यान आता अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या घरावरच हल्ला झाला आहे.

J D Vance Home Attack : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी गेल्या वर्षात घेतलेल्या काही निर्णयांमुळे जगाला हादरा बसला. त्यानंतर आता ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर थेट हल्ला करून या देशाच्या अध्यक्षांनाच बेड्या ठोकल्या आहेत. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो सध्या न्यूयॉर्कमधील तुरुंगात आहेत. ट्रम्प यांच्या या कारवाईचा काही देशांनी निषेध केला आहे. अमेरिकेतही अनेक लोक रस्त्यावर उतरले असून मादुरो यांची सुटका करावी, अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता अमेरिकेत धक्कादायक घटना घडली आहे. येथे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेड व्हान्स यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
महाशक्ती असलेल्या अमेरिका या देशाला हादरवून टाकणारी एक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे सोमवारी (5 जानेवारी) अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये व्हान्स यांच्या घराला असलेल्या खिडक्यांची काच फुटलेली आहे. ही घटना घडताच संशयित आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. अमेरिकेतील सिनसिनाटी येथे इस्ट वॉलनट हिल्स नावाचा एक परिसर आहे. याच परिसरात जेडी व्हान्स यांचे निवासस्थान आहे. याच निवासस्थानावर हल्ला करण्यात आला आहे.
अमेरिकेतील सिक्रेट सर्व्हिसने दिली माहिती
अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार रात्री साधारण 12 वाजून 15 मिनिटांनी हा हल्ला झाला आहे. अमेरिकेतील सिक्रेट सर्व्हिसने या हल्ल्याची माहिती पोलिसांना दिली. हल्ला झाल्यानंतर एक व्यक्ती तेथून पळून गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हालवत या आरोपीला अटक केली आहे.
हल्लेखोर सुरक्षा व्यवस्था भेदून कसा पोहोचला?
दरम्यान, व्हेन्स यांच्या निवासस्थानावर हल्ला करणारा नेमका कोण आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु थेट अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावरच हल्ला करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. व्हेन्स यांच्या निवासाच्या परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था असते. तरीदेखील ही सुरक्षाव्यवस्था भेदून हल्लेखोर व्हेन्स यांच्या निवासस्थानापर्यंत कसा पोहोचला? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
