Nepal Protest : नेपाळमध्ये हाहा:कार, रस्ते रक्ताने लाल; 14 जण ठार, नेमकं काय घडतंय?
नेपाळमध्ये सध्या तरुण चांगलेच संतापले आहेत. आंदोलनात सहभागी झालेले तरुण थेट संसदेवर चालून गेले आहेत. त्यामुळे काठमांडमध्ये सध्या कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

Nepal Kathmandu protest : नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीमुळे तरुणांत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. तेथील सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्याने तरुण चांगलेच आक्रमक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संतापलेले तरुण थेट संसदेवर चालून गेले आहेत. काही तरुणांनी तर थेट संसदेत घुसून तोडफोड केली आहे. या आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याचेही समोर आले आहे. यात आतापर्यंत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 जखमी झाले आहेत. नेपाळमधील काठमांडूमधील रस्ते आता रक्ताने लाल झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार नेपाळ सरकारने एकूण 26 सोशल मीडियावर बंदी घातली आहे. आजघडीला प्रत्येक तरुण सोशल मीडियाव वापरतो. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तरुण आज व्यक्त होतात. मात्र नेपाळमध्ये तब्बल 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातल्याने तिथल्या तरुणांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सोबतच नेपाळमधील भ्रष्टाचाराबाबत तरुणांत मोठा राग निर्माण झाला आहे. यामुळेच हजारो तरुण थेट संसदेवर चालून गेले. काही तरुण थेट संसदेत घुसले. संसदेत जाऊन तरुणांनी तोडफोड केली. संसद परिसरात काही ठिकाणी जाळपोळ केल्याचेही समोर आले आहे. याच संतप्त तरुणांना पांगवण्यासाठी नेपाळमधील सुरक्षा दलांनी थेट गोळीबार केला आहे. तसेच पाण्याचा मारा करून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.
14 जणांचा मृत्यू, 80 जखमी
पोलिसांच्या या गोळीबारात आतापर्यंत एकूण 14 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर 80 पेक्षा जास्त तरुण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. काही संतप्त तरुणांनी तर नेपाळच्या पंतप्रधानांचे पोस्टरदेखील फाडून टाकले आहेत. विद्यार्थी, तरुणांच्या या आक्रमक आंदोलनाळे सध्या नेपाळच्या काठमांडू शहरात अशांतता निर्माण झाली आहे.
काठमांडूमध्ये कर्फ्यूची घोषणा
दरम्यान, तरुणांच्या या आक्रमक आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आता नेपाळच्या सरकारने खरबदारी म्हणून काठमांडूमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. तसेच नेपाळ सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
