एका खास क्रूजमध्ये चढणार 2300 लोक, सर्वच राहणार निर्वस्त्र; पण अट एकच… काय आहे अट? नेमकं चाललं तरी काय?
बेअर नेसेसिटीज कंपनी २०२६ मध्ये 'द बिग न्यूड बोट' नावाची एक निर्वस्त्र क्रूझ सुरू करत आहे. नॉर्वेजियन पर्ल या आलिशान जहाजावर होणाऱ्या या ११ दिवसांच्या प्रवासात बहामास, सेंट लुसिया आणि सेंट मार्टेनची सुंदर बेटे पाहता येतील.

आतापर्यंत तुम्ही क्रूझ म्हटलं की डोळ्यासमोर नाच-गाणे, चमचमणारे कपडे आणि फोटो क्लिक करण्याची धूम हे सर्व येते. पण, जगातील एका आगळ्यावेगळ्या क्रूझने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या क्रूझवर प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना संपूर्ण निर्वस्त्र राहावे लागणार आहे. ‘द बिग न्यूड बोट’ (The Big Nude Boat) असे या क्रूझचे नाव आहे. सध्या या क्रूझच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
बेअर नेसेसिटीज (Bare Necessities) या न्यूडिस्ट ट्रॅव्हल कंपनीने ही क्रूझ सुरु केली आहे. नॉर्वेजियन पर्ल (Norwegian Pearl) नावाच्या आलिशान जहाजावर हा अनोखा अनुभव करता येणार आहे. या जहाजावर एकाच वेळी सुमारे २३०० प्रवासी प्रवास करू शकतात. पुढील वर्षापासून म्हणजेच २०२६ पासून या अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात होणार आहे. याची बुकिंगही आतापासूनच सुरू झाली आहे.
प्रवासाचा उद्देश आणि मार्ग
येत्या २०२६ च्या ३ फेब्रुवारी रोजी मियामीहून हे जहाज ११ दिवसांच्या रोमांचक प्रवासावर जाणार आहे. या प्रवासात प्रवाशांना निर्वस्त्र राहावे लागणार आहे. या प्रवासात बहामासमधील ग्रेट स्टिरअप के, सेंट लुसिया आणि सेंट मार्टेन यांसारखी सुंदर बेटे पाहता येणार आहे. लोकांनी सोशल न्यूडिटी म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी कपड्यांशिवाय राहणे याला सहजपणे स्वीकारावे. त्याबद्दल कोणतेही संकोच करु नये, तसेच प्रवासाचा मनसोक्त आनंद घेता यावा, यासाठी ही निर्वस्त्र राहण्याची अट ठेवण्यात आली आहे.
जहाजावरील सुविधा आणि महत्त्वाचे नियम
नॉर्वेजियन पर्ल हे केवळ एक जहाज नाही, तर यावर तुम्हाला अनेक मनोरंजक ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेता येणार आहे. यात पॅसेंजर टॅलेंट शो, चमकदार एलईडी पार्टी, बॉलिंग ॲली आणि अगदी रॉक क्लाइंबिंग वॉल देखील समाविष्ट आहे. त्यासोबतच खाण्यापिण्यासाठी १६ प्रकारचे डायनिंग ऑप्शन आणि १४ बार आहेत. ज्यात एक खास व्हिस्की लाउंज देखील उपलब्ध आहे.
जेव्हा जहाज समुद्रात असेल किंवा बंदरावर थांबलेले नसेल, तेव्हा तुम्ही डेक किंवा बुफे यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी कपड्यांविना फिरू शकता. पण जहाज कोणत्याही बंदरावर असताना सर्वांना कपडे घालणे बंधनकारक आहे. जहाज पुन्हा समुद्रात निघाल्यावर एक घोषणा केली जाईल. ही घोषणा झाल्यावर तुम्ही पुन्हा कपड्यांविना राहू शकता.
जेवणाच्या खोलीत (डायनिंग रूममध्ये) जेवताना नेहमी कपडे घालणे आवश्यक आहे. जर तुम्ही कपड्यांविना असाल आणि तुम्हाला कुठे बसायचे असेल तर टेबल, खुर्ची किंवा सोफ्यावर काहीतरी (उदा. टॉवेल) ठेवूनच बसावे. पूल आणि डान्स एरियामध्ये फोटो काढायला परवानगी नसेल. तसेच चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे किंवा अश्लील कृत्ये करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाईल, अशी काही नियमावली या प्रवासासाठी करण्यात आली आहे.
पुढील ट्रिप्स आणि बुकिंगची माहिती
पुढील वर्षी २०२६ च्या ट्रिपसाठीचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे. ही सफर ९ फेब्रुवारी रोजी मियामीहून सुरू होईल. हा प्रवास ११ दिवसांचा असेल. ज्यात अरूबा (Aruba), बोनेअर (Bonaire), कुराकाओ (Curaçao), जमैका (Jamaica) आणि ग्रेट स्टरप या आकर्षक बेटांचा समावेश असेल. या अनोख्या अनुभवाची किंमत प्रति व्यक्ती २,००० डॉलर म्हणजे सुमारे १.६ लाख रुपये इतकी आहे.
