India-Belgium : तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, बेल्जियमने पाकिस्तान बाबत भारताला काय शब्द दिलाय?
India-Belgium : बेल्जियमचे पंतप्रधान नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भारताला पाकिस्तान बाबत एक महत्वाचं आश्वासन दिलं आहे. 3 सप्टेंबरला नवी दिल्लीत चर्चा झाली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आलं.

बेल्जियमचे पंतप्रधान नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी दोन्ही देशांमध्ये बरेच करार झाले. बेल्जियमकडून भारताला पाकिस्तान बाबत एक महत्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे. पाकिस्तान सोबत टेक्नोलॉजी आणि लष्करी साहित्य पुरवठ्याचा कोणताही संरक्षण सहकार्य करार करण्यात येणार नाही असं आश्वासन बेल्जियमकडून भारताला देण्यात आलं आहे. दप्रिंटने संरक्षण आणि सुरक्षा आस्थापनांमधील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांना भेटले. 3 सप्टेंबरला नवी दिल्लीत चर्चा झाली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेल्जियमच्या संरक्षण आणि परराष्ट्र व्यापार मंत्र्यांसोबत स्वतंत्र चर्चा केली.
बेल्जियमकडून जी दुसऱ्या देशांना संरक्षण साहित्याच निर्यात होते, त्यातून पाकिस्तानला बाहेर ठेवल्याचं भारत-बेल्जियमच्या संयुक्त निवेदनात किंवा त्यांच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलेलं नाही. या आश्वासनाबद्दल कुठेही सार्वजनिक भाष्य करण्यात आलेलं नाही. संयुक्त निवेदनात बेल्जियमचे पंतप्रधान डी वेवर यांनी असं म्हटलयं की, बेल्जियमचं भारताच्या दहशतवादाविरुद्ध लढाईला समर्थन आहे. यात सीमेपलीकडून चालणाऱ्या दहशतवादाचा समावेश आहे. एप्रिल 2025 मध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.
बेल्जियमने याआधी पाकिस्तानला कुठलं साहित्य विकलय?
“दहशतवाद्यांना जो पैसा पुरवला जातो, त्यांची जी लपण्याची सुरक्षित आश्रय स्थानं आहेत, त्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे. संयुक्त राष्ट्र आणि फायनान्शिअल टास्क फोर्सच्या माध्यमातून ही कारवाई झाली पाहिजे” असं दोन्ही देशांनी म्हटलं आहे. बेल्जियमने याआधी पाकिस्तानला लष्करी विमानाचा पुरवठा केला होता. स्टॉकहोल्म इंटरनॅशनल पीस रिसर्च संस्थेनुसार, ब्लेजियमने 2021 साली वापरलेली सात C-130H ट्रान्सपोर्ट विमानं पाकिस्तानला विकली होती.
अमेरिकेमुळे पाकिस्तानला विकत घेता आलं नाही
पाकिस्तानने 2003 साली बेल्जियमकडे F-16 फायटर विमानं सुद्धा मागितली होती. पण हा विक्री व्यवहार होऊ शकला नाही, कारण F-16 ही अमेरिकन बनावटीची विमानं आहेत. या विमानांच्या विक्रीसाठी अमेरिकेची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे. 2021-25 दरम्यानचा पाकिस्तान हा जगातील पाचवा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश आहे. SIPRI च्या रिपोर्टनुसार, या चार वर्षाच्या काळात पाकिस्तानने चीनकडून 80 टक्के लष्करी साहित्याची आयात केली. त्यानंतर तुर्कीकडून 7 टक्के आणि नेदरलँड्सकडून 4.6 टक्के आयात केली.
