NSA Ajit Doval : बदला चांगला शब्द नाही, पण बदला घेतला पाहिजे, कुशल रणनितीकार NSA अजित डोवाल यांचे शब्द
"तुम्ही जो निर्णय घ्याल, तो आजसाठी नाही भविष्यासाठी असेल. नव्या वर्षात अनेक लोक संकल्प करतात. पण तो पूर्ण करत नाहीत. योग्य निर्णय घेणं खूप आवश्यक आहे. दूरदृष्टीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे" असं अजित डोवाल यांनी सांगितलं.

“आज जगात जिथेही युद्ध आणि संघर्ष सुरु आहे, तिथे काही देशांना आपल्या इच्छा दुसऱ्यांवर लादायच्या आहेत. त्यासाठी ते बल प्रयोग करत आहेत. आपण युद्ध का लढतो? आपण सायकोपॅथ थोडी आहोत, जे शत्रुचे मृतदेह पाहून संतुष्ट होऊ. कुठल्याही देशाचं मनोबल तोडण्यासाठी युद्ध लढलं जातं” असं देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले. NSA विकसित भारत कार्यक्रमात बोलत होते. “शत्रुचं मनोबल इतकं तुटलं पाहिजे की, आपल्या इच्छांनुसार त्याने करार केला पाहिजे. जेव्हा तुमच्यात इच्छाशक्ती असेल, तेव्हा राष्ट्राचं मनोबल वाढेल. तुम्ही शक्तीशाली असाल, तर स्वतंत्र आहात. जर, तुमच्यात सर्वकाही आहे, मनोधैर्य नसेल, तर सर्व अस्त्र-शस्त्र बेकार आहेत. त्यासाठी नेतृत्व पाहिजे” असं अजित डोवाल म्हणाले.
“आपण भाग्यशाली आहोत, देशात आज असं नेतृत्व आहे, ज्याने 10 वर्षात देशाला ऑटो मोडमध्ये नेलं. आमची गावं जाळली, सिविलायज़ेशन संपवण्यात आलं, मंदिरांमध्ये लूट झाली आणि आम्ही मूकदर्शक बनून असहाय्यपणे पाहत बसलो. इतिहास आपल्याला आव्हान देतो. आज प्रत्येक युवकाच्या मनात प्रतिशोध बदल्याची भावना असली पाहिजे. बदला हा चांगला शब्द नाही. पण तो स्वत:मध्येच एक शक्तीशाली शब्द आहे” असं अजित डोवाल यांनी सांगितलं.
..तर ती देशासाठी मोठी ट्रॅजेडी ठरेल
“आपल्याला देशाला पुन्हा त्या उंचीवर घेऊन जायचं आहे, जिथे हक्क, विचार आणि श्रद्धेच्या आधारावर महान राष्ट्राचा निर्माण करु शकू. आपली खूप विकसित सभ्यता होती. आपण कोणाची मंदिरं तोडली नाहीत, कुठे जाऊन लुटालूट केली नाही. कुठल्या दुसऱ्या देशावर आक्रमण केलं नाही. आम्ही आपली सुरक्षा आणि बाहेरील धोका ओळखू शकलो नाही. आपण त्या बद्दल उदासीन राहिलो, इतिहासाने आपल्याला धडा शिकवला. आपण तो धडा लक्षात ठेवणार आहोत का?. जर, पुढची येणारी पिढी तो धडा विसरली, तर ती देशासाठी मोठी ट्रॅजेडी ठरेल” असं अजित डोवाल म्हणाले.
तर निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे
“अजित डोवाल यांनी या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल मंत्र्यांचे आभार मानलेत. इथे येण्याआधी माझ्या मनात थोड्या शंका होत्या. हा युवकांचा कार्यक्रम आहे. माझ्या आणि तुमच्या वयात मोठं अंतर आहे. तुम्ही माझ्यापेक्षा 60 वर्षांनी छोटे आहात. माझा जन्म स्वतंत्र भारतात झाला नाही. देश गुलामगिरीत असताना माझा जन्म झाला” असं अजित डोवाल म्हणाले.
“मोदीजी ज्या गतीने देशाला घेऊन जात आहेत, त्याने देश विकसित होणारच आहे. प्रश्न हा आहे की, विकसित भारताचं नेतृत्व कोण करणार?. विकसित भारताचं नेता बनायचं असेल, तर निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे” असं अजित डोवाल यांनी मत व्यक्त केलं.
