Asim Munir : ट्रम्पनी खांद्यावर हात ठेवताच पाकिस्तानचा लष्करप्रमुख मुनीर चेकाळला, थेट अमेरिकेतून भारताला धमकी
Asim Munir : पाकिस्तानचा जिहादी मानसिकतेचा लष्करप्रमुख असीम मुनीरला ऑपरेशन सिंदूरचा विसर पडला आहे. अवघ्या दोन महिन्यापूर्वी भारताने पाकिस्तानला चांगलच धुतलं होतं. असीम मुनीरने आता अमेरिकेतून भारताला धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भेट झाल्यानंतर असीम मुनीरचा आत्मविश्वास भलताच वाढला आहे.

पाकिस्तानचा जिहादी मानसिकतेचा लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर नुकताच अमेरिका दौऱ्यावर गेला होता. अमेरिकेतून त्याने भारताला धमकी दिली आहे. ऑपरेशन सिंदूरचा त्याला विसर पडला आहे. मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानला चांगलच धुतलं होतं. पण अमेरिका दौऱ्यात ट्रम्पनी मुनीरच्या खांद्यावर हात ठेवताच पुन्हा पाकिस्तान आपल्या मूळ पदावर आला आहे. “भविष्यात भारतापासून आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास इस्लामाबाद स्वत:सोबत निम्मं जग उद्धवस्त करेल” अशी धमकीची भाषा मुनीरने केलीय. दप्रिंट नुसार टैम्पा येथे आयोजित कार्यक्रमात मुनीरने हे वक्तव्य केलं. “आम्ही एक अणवस्त्र संपन्न देश आहोत. आम्हाला जर असं वाटलं की, आम्ही बुडतोय, तर आम्ही स्वत:सोबत निम्म्या जगाला घेऊन बुडू” असं असीम मुनीर बोलला. असीम मुनीर याच्या वक्तव्यावरुन अणवस्त्र एक जबाबदार देशाच्या हातात नसल्याचं स्पष्ट होतं.
टैम्पामधील पाकिस्तानचे मानद वाणिज्य दूत अदनान असद यांच्यासाठी एक ब्लॅक-टाई डिनरचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात असीम मुनीरने अणवस्त्र धमकीचा जुना राग आळवला. भारत पाकिस्तानच्या अणवस्त्र धमकीला अजिबात भीक घालत नाही, हे ऑपरेशन सिंदूरच्यावेळीच स्पष्ट झालय. अणवस्त्र धमकीनंतर मुनीरने सिंधू जल कराराचा मुद्दा उपस्थित केला. भारताने हा करार स्थगित केल्यामुळे 25 कोटी लोक उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहेत, असं मुनीर म्हणाला.
भारताला दिली मिसाइल हल्ल्याची धमकी
“सिंधू जल करार स्थगित करणाऱ्या भारताने तिथे धरण बांधलं, तर आम्ही 10 मिसाइल डागून ते धरण फोडून टाकू” असा इशारा असीम मुनीरने दिला. “सिंधू नदी भारताची कौटुंबिक संपत्ती नाही. आमच्याकडे मिसाइल्सची कमतरता नाहीय” असं मुनीर बोलला. ब्लॅक-टाई डिनरसाठी आमंत्रित लोकांना मोबाइल फोन किंवा अन्य डिजिटल उपकरणं घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. कथितरित्या मुनीरने आपल्या भाषणाता भारतासोबत झालेल्या संघर्षाचा अनेकदा उल्लेख केला.
भारत-अमेरिका तणावावर काय बोलला?
दप्रिंटने मुनीरच्या हवाल्याने म्हटलं आहे की, “आम्ही भारताच्या पूर्वेपासून सुरुवात करु, जिथे त्यांचे मूल्यवान स्त्रोत आहेत. त्यानंतर पश्चिमेला जाऊ” ट्रम्प आणि टॅरिफवरुन भारत-अमेरिकेत निर्माण झालेल्या राजकीय तणावाचा त्यांनी उल्लेख केला. “आम्ही कंजूस नाही हे आमच्या यशाचं मुख्य कारण आहे. आम्ही राष्ट्रपती ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी सन्मानित केलय” असं मुनीर म्हणाला.
