पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये; अमेरिकेनं झापलं

पहलगाम हल्ल्याचा सूड म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. त्यानंतर आमच्या देशातील नागरिकांवर लक्ष्य केल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. यावरून आता अमेरिकेनं पाकिस्तानला चांगलंच झापलं आहे.

पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये; अमेरिकेनं झापलं
संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ
Image Credit source: ANI
| Updated on: May 09, 2025 | 3:14 PM

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावल्यानंतर भारताच्या सूड घेण्याच्या अधिकाराला अमेरिकेतील मोठ्या नेत्याने पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेच्या माजी अध्यक्षपदाच्या उमेदवार आणि संयुक्त राष्ट्राच्या अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं समर्थन केलंय. भारताच्या बदला घेण्याच्या अधिकाराचं समर्थन करत त्या म्हणाल्या, “पाकिस्तानने आता विक्टिम कार्ड (Victim Card) खेळू नये.” याविषयी त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला थेट सुनावलं आहे.

‘पहलगाममध्ये हल्ला करून दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. त्यानंतर प्रत्युत्तर देण्याचा आणि स्वत:चा बचाव करण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे. पाकिस्तानने आता आपण हल्ला पीडित आहोत वगैरे कार्ड खेळू नये, उगाच कांगावा करू नये. दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्याही देशाला परवानगी मिळत नाही,’ असं त्यांनी लिहिलं आहे. पहलगाम हल्ल्याचा सूड म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत नऊ दहशतवादी तळांवर एअर-स्ट्राइक केला. या हवाई हल्ल्यात फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र तरीही ऑपरेशन सिंदूरदरम्यान नागरिकांना लक्ष्य करण्यात आलं होतं, असा कांगावा पाकिस्तानने केला होता. याउलट जागतिक स्तरावर भारताच्या ऑपरेशन सिंदूरला अनेक देशांचा पाठिंबा मिळाला.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेली कारवाई हा त्या हल्ल्याचा प्रतिसाद होता. त्यामुळे तणाव कमी करणं हे पाकिस्तानच्या हाती आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पाकिस्तानला सुनावलं. ‘द रेझिस्टन्स फोर्स’ या दहशतवादी संघटनेनं दोन वेळा पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारूनही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावातून या संघटनेचं नाव हटविण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केल्याचं मिस्री यांनी अधोरेखित केलं. दरम्यान दोन्ही देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर संयम बाळगण्याचं आवाहन इतर देशांकडून केलं जात आहे. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वात जागतिक प्रयत्न सुरू असल्याचा दावा पाकिस्तानी संरक्षणमंत्री असिफ यांनी केला.