
Donald Trump : जम्मू काश्मीरमधील पहलगामवरील हल्ल्यानंतर भारताने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या मोहिमेत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पराकिस्ताननेही भारतावर हल्ले केले होते. नंतर हे युद्ध मीच थांबवले असा उघड दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. आता ट्रम्प यांच्या याच दाव्यावर आता पाकिस्तानातून मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. भारत हे युद्ध थांबवण्यास सहमत नव्हता असे खुद्द पाकिस्ताननेच मान्य केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षाला थांबवण्यााच प्रस्ताव अमेरिकेच्या माध्यमातून आला होता. मात्र या प्रस्तावावर भारत सहमत नव्हता, असे डार यांनी म्हटले आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मीच थांबवला असा दावा करणाऱ्या ट्रम्प यांचे खोटे आता उघडे पडले आहे.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान चालू झालेल्या संघर्षाला थांबवण्यासाठी पाकिस्तानने भारताशी अनेकवेळा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. 10 मे रोजीच्या सकाळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रुबियो यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लवकरच एका अन्य ठिकाणी चर्चा होईल, असे सांगितले होते. त्यानंतर 25 जुलै रोजी रुबियो आणि डार यांची वॉशिंग्टन येथे भेट झाली. या भेटीत रिबियो यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हा फक्त द्विपक्षीय वाद आहे. यात अन्य कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका आम्हाला मान्य नाही, असे भारताने सांगितल्याचे रुबियो यांनी मला कळवले असेही डार यांनी म्हटले आहे.
तसेच, भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी आम्ही अन्य तिसऱ्या सदस्याच्या मध्यस्थिला तयार आहोत. पण भारताची यासाठी तयारी नाही. हा फक्त द्विपक्षीय मुद्दा आहे, अशी भारताची भूमिका आहे. नुकत्याच भारत-पाकिस्तान संघर्षात युद्धविरामाचा प्रस्ताव आला होता, तेव्हा भारताशी आमची चर्चा होईल, असे रुबियो यांनी सांगितले होते. मात्र नंतर भारताने चर्चा करण्यास नकार दिला, असेही डर यांनी सांगितले. दरम्यान, आता पाकिस्तानच्याच परराष्ट्रमंत्र्यांनी भारताची भूमिका काय होती, याबाबत सांगितल्यामुळे आता अमेरिका नेमके काय म्हणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.