लवकरच पाकिस्तान भारताला पेट्रोल-डिझेल पुरवेल, डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारला थेट डिवचले, पाकड्यांचा पुळका की दबावतंत्र?

Pakistan supply crude oil : पाकिस्तान भारताला लवकरच पेट्रोल-डिझेल पुरवू शकतो, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. जवळचा मित्र म्हणवणाऱ्या ट्रम्प यांनीच मोदी सरकारला डिवचले आहे. त्यांचा हा प्रयत्न दबावतंत्राचा भाग असल्याचे मानले जात आहे.

लवकरच पाकिस्तान भारताला पेट्रोल-डिझेल पुरवेल, डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारला थेट डिवचले, पाकड्यांचा पुळका की दबावतंत्र?
ट्रम्प यांनी मोदी सरकारला डिवचले
| Updated on: Jul 31, 2025 | 8:44 AM

पाकिस्तान लवकरच भारताला पेट्रोल-डिझेल, इंधनाचा पुरवठा करू शकतो, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. जवळचा मित्र म्हणवणाऱ्या ट्रम्प यांनीच मोदी सरकारला डिवचले आहे. ट्रम्प यांना खरंच पाकिस्तानचा पुळका आलाय की भारतावर दबावतंत्राचा हा प्रयोग आहे, याची चर्चा आता रंगली आहे. मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांपासून इंधन खरेदीत रशियाला झुकते माप दिले आहे. अमेरिकेच्या दादागिरीला भीक न घातल्यानेच ट्रम्प अशी खेळी खेळत असल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानला घेतले मांडीवर

भारतावर अमेरिकेने 25 टक्के टॅरिफ आणि इतर भारीभक्कम शुल्क लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी केली. त्यानंतर लागलीच त्यांनी पाकिस्तानसोबत व्यापारी कराराची इत्यंभूत माहिती दिली. या करारात प्रामुख्याने एका गोष्टीचा उल्लेख ट्रम्प यांनी केला. पाकिस्तानातील तेलसाठ्यांचा शोध आणि उत्पादन करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतक्यावर थांबतील ते ट्रम्प कसले? त्यांनी आपण मुत्सद्देगिरीत आणि रणनीतीत कसलेले आहोत, हे दाखवण्यासाठी मोदी सरकारला डिवचले. या कराराचे फलित काय होईल हे सांगताना, भारतासाठी पाकिस्तान हा भविष्यातील तेलाचा संभाव्य स्त्रोत असेल, असे अप्पलपोटी वक्तव्य केले. ट्रम्प यांनी समाज माध्यम X वर त्याविषयीचे मुद्दे मांडले आहे. वॉशिंग्टन आणि इस्लामाबादमधील या खलबतांची त्यांनी जगाला माहिती करून दिली. भारतावर हा दबावतंत्राचा प्रयोग आहे, असे मानण्यात येत आहे.

पाकिस्तान विकेल भारताला इंधन

“आम्ही आताच पाकिस्तानसोबतचा व्यापारी करार पूर्ण केला. त्यानुसार, पाकिस्तान आणि संयुक्त अमेरिका हे दोन्ही देश मोठ्या प्रमाणात तेलसाठ्यांचा शोध आणि त्याचे उत्पादन करु. दोन्ही देशांनी एक कंपनी या सर्व प्रक्रियेसाठी निश्चित केली आहे. कुणाला माहिती काही दिवसांनी ही कंपनी भारताला सुद्धा इंधन विक्री करेल.” डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ट्विटने पाकिस्तानमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतीलही पण त्यांना भारतीय परराष्ट्र नीतीचा राग आलाय हे निश्चित मानण्यात येत आहे. मोदी सरकारने इंधन खरेदीत अमेरिकेला किंमत न दिल्याने त्याची तो भारताला किंमत मोजायला लावण्याचा प्रयत्नात आहे. अर्थात रशिया या काळात भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा ठाकण्याची शक्यता आहे.

चीनला अमेरिकेचा शह

काही जण हा भारतासोबतच चीनला पाकिस्तानमध्ये शह देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत आहे. चीनने गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये चांगलेच बस्तान बसवले आहे. पाकिस्तानने बलुचिस्तान जणू चीनला आंदण म्हणूनच दिला आहे. बलूच आर्मीचा त्याला विरोध आहे. आता अमेरिका पाकिस्तानला आपल्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानच्या खांद्यावरून भारतासह चीनवर त्याने निशाणा साधल्याचा दावा करण्यात येत आहे.