पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर, हजारो भारतीयांनी बलिदान दिलेल्या ठिकाणी वाहणार श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स दौरा सुरू आहे. या दौऱ्यात त्यांनी AI अॅक्शन समिटला उपस्थिती लावली. तसेच मझारग्यूज वॉर सेमेटरीला भेट देऊन पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्स दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी एआय अॅक्शन समिटला हजेरी लावली. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. आता या समिटनंतर नरेंद्र मोदी हे फ्रान्समधील मार्सेली येथील माझारग्युस वॉर सेमेटरीलाही (Mazargues War Cemetery) म्हणजेच या ठिकाणी असलेल्या युद्ध स्माशनभूमीला भेट देतील. ही जागा पहिल्या महायुद्धाशी संबंधित आहे. फ्रान्समध्ये जर्मन सैनिकांशी लढताना सुमारे चार हजार भारतीय सैनिक शहीद झाले होते. या स्मशानभूमीच्या मागे 205 भारतीय सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्मारकही बांधण्यात आले आहे. ज्याला मजारग्युस वॉर सेमेटरी म्हणून ओळखले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या माझारग्युस वॉर सेमेटरीलाही (Mazargues War Cemetery) या ठिकाणी जाऊन त्या स्मारकास्थळी जाऊन सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करुन पुष्पचक्र अर्पण करतील. यामुळे भारत आणि फ्रान्स यांच्यातील ऐतिहासिक संबंध पुन्हा एकदा दृढ होणार आहेत. पंतप्रधान मोदी हे परदेशी दौऱ्यावर असताना बलिदान दिलेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात. यापूर्वीही अनेक परदेशी दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी परदेशात बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पंतप्रधान मोदींकडून परदेशात बलिदान देणाऱ्यांना श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनबेरामधील ऑस्ट्रेलियन वॉर मेमोरियलला अभिवादन केले होते. हे एक युद्ध स्मारक आहे. पहिल्या महायुद्धात ज्या सैनिकांनी प्राण गमावले त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बनवण्यात आले आहे.
यानंतर पंतप्रधान मोदींनी 2015 मध्ये फ्रान्समधील नेव्ह-शापेल वर्ल्ड वॉर 1 मेमोरियलला भेट दिली होती. यावेळी ते पहिल्यांदा भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेले होते. नोव्हेंबर 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरमधील INA मेमोरियल मार्करवर भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. याठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले.
पहिल्या महायुद्धातील भारतीय सैनिकांच्या योगदानावर भाष्य
यानंतर जुलै 2017 मध्ये, पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलमधील हाइफा येथील भारतीय वॉर कॅमेट्रीला भेट दिली. याठिकाणी अनेक भारतीय सैनिकांना त्यांनी आदरांजली अर्पण केली. सप्टेंबर 2018 मध्ये त्यांनी मन की बात दरम्यान हाइफाच्या लढाईतील भारतीय सैनिकांबद्दल सांगितले होते. यानंतर ऑक्टोबर 2018 मध्ये पंतप्रधान मोदींनी पहिल्या महायुद्धातील भारतीय सैनिकांच्या योगदानावर भाष्य केले होते. “आपला त्या युद्धाशी थेट संबंध नव्हता. तरीही आपल्या सैनिकांनी अतिशय धैर्याने लढाई केली आणि त्यांनी बलिदान दिले.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
यानंतर जून 2023 मध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या इजिप्त दौऱ्यादरम्यान काहिर्यातील हेलिओपोलिस कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह कॅमेट्रीला भेट दिली. यावेळी त्यांनी पहिल्या महायुद्धात इजिप्त आणि अडनमध्ये शहीद झालेल्या ४३०० पेक्षा अधिक भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये, पंतप्रधान मोदी यांनी पोलंडमधील वॉरसा येथे मोंटे कॅसिनोच्या लढाईदरम्यान शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. मोंटे कॅसिनोच्या लढाईत भारत, पोलंड आणि इतर देशांच्या सैनिकांनी एकत्र लढाई केली होती.
