Russia-Pakistan : पाकिस्तानात दररोज सुरु आहे पुतिन विरोध, पण एवढं होऊनही रशियाला पाकची नियत साफ वाटते, काय बोलावं?
Russia-Pakistan : पाकिस्तानात सध्या दररोज पुतिन विरोध सुरु आहे. त्यावर रशियन दूतावासने सोशल मिडिया हँडल एक्सवर पोस्ट करुन स्पष्टपणे आपल मत मांडलय. पण हे करताना त्यांनी पाकिस्तानला पूर्णपणे दोषी मानलेलं नाही.

पाकिस्तानातील रशियन दूतावासाने द फ्रंटियर पोस्ट या इंग्रजी वर्तमानपत्राचा चांगलाच समाचार घेतला आहे.रशियन दूतावासाने या वर्तमानपत्रावर रशिया विरोधी लेख आणि मॉस्को विरुद्ध पाश्चिमात्य देशांना अनुकूल प्रचार केल्याचा आरोप केला आहे. रशियन दूतावासाने सोशल मीडिया हँडल एक्सवर एक स्टेटमेंट प्रसिद्ध करुन कठोर शब्दात या वर्तमानपत्रावर निशाणा साधला आहे.वर्तमानपत्र आता जाहीरपणे रशियाचा विरोध करतय असं दूतावासाने म्हटलं आहे. द फ्रंटियर पोस्ट हे मूळचं पाकिस्तानी वर्तमानपत्र आहे का? यावर सुद्धा दूतावासाने प्रश्न उपस्थित केलाय. कट्टर रशिया विरोधी लेखकांचे लेख या वर्तमानपत्रात प्रकाशित केले जातात असा आरोप रशियन दूतावासाने केलाय. “आम्ही इंग्रजी भाषेतील पाकिस्तानी वर्तमानपत्र द फ्रंटियर पोस्टमध्ये प्रकाशित होणाऱ्या रशिया विरोधी लेख वाचले. सर्वप्रथम या वर्तमानपत्राला पाकिस्तानी म्हणणं मुश्किल आहे. कारण यांचा जागतिक बातम्या विभाग वॉशिंग्टनमध्ये आहे” असं दूतावासाने म्हटलय.
वर्तमानपत्राचा संपादकीय विभाग सतत रशियाचं परराष्ट्र धोरण आणि नेतृत्वावर टीका करणाऱ्या लेखांची निवड करतो. त्यामुळे संतुलित रिपोर्टिंगला काही संधीच राहत नाही, असं रशियन दूतावासाने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. अलीकडच्या काही दिवसात वर्तमानपत्राच्या इंटरनॅशनल सेक्शनमध्ये रशियाला पॉझिटिव्ह किंवा तटस्थ दाखवणारा एकही लेख मिळाला नाही असं रशियन दूतावासाने म्हटलय. द फ्रंटियर पोस्टमधील साहित्य आता प्रचार स्वरुपाचं बनलं आहे. रशिया विरोधी लेखांचा येथे पूर आहे. पाश्चिमात्य देशांचा प्रचार केला जातोय. वर्तमानपत्राचं धोरण खरच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आहे का? की, रशिया विरोधी शक्तींचे अजेंडा चालवणं असा प्रश्न निर्माण होतो, असं दूतावासाने म्हटलय.
पाकिस्तानसाठी आजही अमेरिका जास्त जवळचा
आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचा सच्चा मित्र कोण असेल, तर रशिया. अलीकडच्या काही महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे ही मैत्री अधिक दृढ झाली. भारताने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे न झुकता आपली भूमिका कायम ठेवली. भारत आणि रशिया चांगले मित्र असले, तरी अलीकडे पाकिस्तानने सुद्धा रशियाशी मैत्री वाढवली आहे. दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध निर्माण होतायत. पण पाकिस्तानसाठी आजही अमेरिका जास्त जवळचा देश आहे.
पाकिस्तानची नियत साफ वाटते का?
आता पाकिस्तानातील एक वर्तमानपत्र रशिया विरुद्ध गरळ ओकतय. मात्र, तरीही रशियाने द फ्रंटियर पोस्टवर टिका करताना शब्द जपून वापरले आहेत. पाकिस्तानला पूर्णपणे दोषी मानलेलं नाही. द फ्रंटियर पोस्ट हे मूळचं पाकिस्तानी वर्तमानपत्र आहे का? असं रशियाने म्हटलय. म्हणजे पाकिस्तानातून दररोज रशिया विरोधी प्रचार सुरु असतानाही रशियाला अजून पाकिस्तानची नियत साफ वाटते का? हा प्रश्न यामुळे निर्माण होतो.
