टॅरिफ वॉर सुरु असतानाच रशियाचे अध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर, मोदी आणि पुतीन यांची वर्षअखेर भेट
एकीकडे अमेरिकेचे टॅरिफ वॉर सुरु असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताचा दौरा करु शकतात. अद्याप त्यांच्या येण्याची तारीख नक्की झालेली नसली तरी रशियन माध्यमांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

एकीकडे अमेरिका आणि रशियात वाद सुरु असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावून मोठा दणका दिला आहे. या टॅरिफ वॉर दरम्यान आता रशियाशी चर्चा करण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल मॉस्कोत पोहचले आहेत. तेथे ते रशियन अधिकारी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहेत. याआधी रशियाची इंटरफॅक्स न्यूज एजन्सीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हवाल्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन वर्षअखेर भारताचा दौरा करु शकतात असे म्हटले आहे. या बातमीला अद्यापही रशियाकडून किंवा भारताकडून अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
अमेरिकेचे दूत स्टीव्ह विनकॉफ देखील रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी पुतीन यांची भेट घेतली. परंतू दोन्ही देशात कोणताही महत्वाचा करार झालेला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर या भेटीनंतरही २५ टक्के टॅरिफ आणखी वाढवले आहे. याच दरम्यान रशियातील मॉस्कोत पोहचलेल्या एनएसए डोभाल यांच्या मार्फत रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा भारत दौरा असल्याचे कन्फर्म केल्याने हे स्पष्ट झाले आहे की भारत आता अमेरिकेच्या धमकीला भिक घालणार नाही. भारताने आधीच स्पष्ट केले आहे की रशियाचा आमचा जुना विश्वासू मित्र आहे, भारत रशियाशी व्यापारी आणि राजकीय संबंध सहज तोडणार नाही. ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर पुतीन यांचा भारत दौरा होण्याची घोषणा झाल्याने तर भारत आणि अमेरिकेतील संबंध आणखीनच बिघडण्याची शक्यता आहे.
एक साथ येणार तीन महाशक्ती
रशियन मीडियातून या बातम्या अशा वेळी येत आहेत जेव्हा याच महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान मोदी चीनला जाऊन SCO शिखर परिषदेत सहभाग घेणार आहेत. त्यांचा हा दौरा २०२० च्या गलवान संघर्षांनंतर भारत-चीन संबंध सामान्य करण्याच्या दिशेने उचललेले पाऊल मानले जात आहे. २१ ऑक्टोबर २०२४ मध्ये कझानमध्ये ब्रिक्स शिखर परिषदे दरम्यान मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर सीमा तणाव कमी करण्यावर सहमती बनली होती. SCO मध्ये भारत, रशिया, आणि चीन एकत्र येणे अमेरिका-युरोपच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकते. यामुळे भारत-चीन संबंध सामान्य करणे आणि भारत – रशिया व्यापाराला मजबूत करण्याची संधी असणार आहे. कारण तिन्ही देशांना सध्या अमेरिकेच्या जबरदस्त टॅरिफचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या तिघांची भेट जागतिक राजकारणासाठी महत्वाची ठरणार आहे.
रशिया – भारत शिखर परिषद वर्षअखेर
कझान येथे ब्रिक्स शिखर परिषदे दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांना २०२५ मध्ये भारतात होणाऱ्या भारत-रशिया शिखर परिषदेचे आमंत्रण दिले होते. ही भेट साल २०२५ पर्यंत होण्याची शक्यता आहे. कारण भारत-रशिया शिखर संमेलन सर्वसाधारणपणे दरवर्षी आयोजित केले जाते. दोन्ही नेत्यांनी साल २०२४ मध्ये एकमेकांची दोन वेळा भेट घेतली होती. परंतू यावेळची भेट जागतिक परिस्थिती बदललेली असतान होत आहे.
