सर्वाधिक पगार घेण्याचा सिंगापूरच्या पंतप्रधानांचा विक्रम, वेतनात इतकी मोठी वाढ, पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पगार किती?
Singapore PM Lawrence Wong Salary: सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी मंगलवारी संसदेला सांगितले की, देशातील मंत्र्यांचा पगार वाढवण्यात येणार आहे. मंत्र्यांच्या वेतनात 60 टक्क्यांहून अधिकची वाढ होईल. सिंगापूरच्या मंत्र्यांचे वेतन अगोदरच सर्वाधिक आहे.

सिंगापूरचे पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या वेतनात मोठी वाढ झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांचे वार्षिक वेतन 2.2 दशलक्ष सिंगापुर डॉलरहून वाढून ते 3.6 दशलक्ष सिंगापूर डॉलर इतके झाले आहे. भारतीय चलनात हा आकडा 27 कोटी 10 लाख रुपये इतका मोठा आहे. या नवीन वेतन दरवाढीने नाराजी पसरली आहे. कारण यापूर्वीच सिंगापूरमधील पंतप्रधान, मंत्र्यांचे वेतन जगात सर्वाधिक आहे. पंतप्रधान वोंग यांनी सांगितले की, पगारात जी वाढ झाली आहे, तिचा वापर हा सामाजिक कार्यासाठी करण्यात येईल. वेतन वाढीतील फरक ते सामाजिक कार्यासाठी वापरतील.
मोठ्या पगारवाढीमागे काय युक्तीवाद?
वोंग सरकारने वेतन वाढीविषयी मोठा युक्तीवाद केला आहे. राजकारणात इतके पैसे मिळत असतील तर चांगली माणसं या क्षेत्रात येतील असा अजब दावा या सरकारने केला आहे. तरुण पिढी राजकारणाकडे आकर्षित होईल, सुशासन असेल. भ्रष्टाचाराला थारा उरणार नाही, असा प्रतिवाद सिंगापूर सरकारने वेतनवाढीवरील नागरिकांच्या नाराजीनंतर केला आहे. सिंगापूरच्या श्रीमंत नागरिकांच्या कमाईपेक्षा सरकारमधील मंत्र्यांच्या वेतनाचा आकडा वाढल्याने सुद्धा नाराजी व्यक्त होत आहे.
पंतप्रधान वोंग यांचा पगार 3.6 दशलक्ष सिंगापुर डॉलर
सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांचे यापूर्वी 2.2 दशलक्ष सिंगापुर डॉलर इतके वेतन होते. ते वाढून आता 3.6 दशलक्ष सिंगापुर डॉलर इतके झाले आहे. त्यांच्या वेतनात घसघशीत 1.4 दशलक्ष सिंगापुर डॉलरची भर पडली आहे. भारतीय चलनात हा वार्षिक पगाराचा आकडा जवळपास 27 कोटींच्या घरात जातो. सिंगापूरमध्ये भारतीय, चीन आणि इतर समुदायांच्या लोकांची मोठी संख्या आहे.
भारतीय पंतप्रधानांचा पगार किती?
भारताच्या पंतप्रधानांना दरमहा 1,66 लाख रुपये पगार देण्यात येतो. म्हणजे वार्षिक पगार 19.92 लाख पगार मिळतो. यामध्ये 50,000 रुपये मूळ वेतन, 3,000 रुपये सरकारी भत्ता, 45,000 रुपये संसदीय भत्ता आणि दैनिक भत्ता म्हणून 2 हजार रुपये यांचा समावेश आहे. याशिवाय सेवा निवृत्ती वेतन, मोफत निवासस्थान, प्रवास सुविधा आणि इतर अनुषांगिक लाभ देण्यात येतात.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला किती पगार?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला वार्षिक 4 लाख अमेरिकन डॉलर इतके वेतन देण्यात येते. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा 3.35 ते 3.40 कोटी रुपये प्रतिवर्ष इतका होतो. याशिवाय 42 लाखांचा वैयक्तिक खर्चासाठी भत्ता देण्यात येतो. 84 लाखांचा भत्ता हा प्रवासासाठी देण्यात येतो. एकत्रित अनुषंगिक 4.75 कोटी रुपये मिळतात. पण येथील राष्ट्राध्यक्षाची कमाई करपात्र असते, हे विशेष.
