
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही महिन्यांपासून हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या टॅरिफ धोरणामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून येत आहे. भारतावरही डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ लावला. एकीकडे मैत्रिपूर्ण संबंध दाखवायचे आणि दुसरीकडे अडचणीत आणण्याचे धोरण अवलंबले आहे. भारताच्या 100 रुपयाच्या वस्तूची किंमत अमेरिकेत 150 रुपये होणार आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर थेट परिणाम होणार आहे. असं असताना रशिया आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शुक्रवारी भेटणार आहेत. भारतावर टॅरिफ लादल्याने आधीच रशियाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. पण या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बरळले आहेत. त्यामुळे या बैठकीत काय होईल याचा अंदाज आधीच बांधला जात आहे. ट्रम्प यांनी दोन्ही देशात व्यापाराची शक्यता वर्तवली आहे. तसेच स्पष्ट केलं की , पहिल्या दोन मिनिटातच काही करार होईल की नाही ते स्पष्ट होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत पहिलाच खुलासा केला आहे.
अमेरिका आणि रशियात व्यापार करार होऊ शकतो का? या प्रश्नावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, हो मला वाटते. रशियाकडे मौल्यवान जमीन आहे. जर व्लादीमीर पुतीन युद्धाऐवजी व्यापाराकडे वळले तर… पण माझ्या एका मित्राने सांगितलं की हे कठीण आहे. कारण ते फक्त लढत राहतात.’ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे सांगितलं की, ‘आम्ही व्लादिमीर पुतिनसोबत एक बैठक करणार आहोत. त्या बैठकीच्या शेवटी, कदाचित सुरुवातीच्या दोन मिनिटातच मला कळून जाईल की करार होऊ शकतो की नाही.’ रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान होणारी बैठक महत्त्वाची आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, ‘मी युद्ध विराम पाहू इच्छित आहे. मी दोन्ही बाजूंसाठी सर्वोत्तम शक्य तो करार पाहायचा आहे.’
ट्रम्प यांनी सांगितलं की, ‘पुढची बैठक जेलेंस्की आणि पुतिन, किंवा जेलेंस्की-पुतिन आणि माझ्या होईल. गरज पडली तर मी तिथे उपस्थित असेन. पण दोन्ही नेत्यांमध्ये एक बैठक निश्चित करू इच्छित आहे.’ दुसरीकडे, ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, अनेक देशांवर लादलेल्या टॅरिफ शुल्कामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. ट्रम्प म्हणाले की, ‘मला वाटते की, रशियाने आपला देश पुन्हा उभारायला हवा. तो एक मोठा देश आहे. रशियाकडे चांगले काम करण्याची भरपूर क्षमता आहे. ते चांगलं काम करत नाहीत. त्यांची अर्थव्यवस्था डगमगली आहे.’