अमेरिकेने इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर टाकले बंकर बस्टर बॉम्ब, काय फक्त अमेरिकेकडेच आहे ही शक्ती? जाणून घ्या A to Z माहिती
एमओपी एक 30,000 पाउंड वजनाचा बॉम्ब आहे. लष्करी तज्ज्ञांनुसार, हा बॉम्ब आधीच्या तुलनेत अधिक प्रगत झाला आहे. हा बॉम्ब जवळपास २०० फूट जमिनीत जाऊन स्फोट घडवून आणतो.

Iran Israel conflict: इस्रायल आणि इराणमधील युद्धात आता अमेरिकाही उतरली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हल्ला केला आहे. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान प्रकल्पाचा समावेश आहे. अमेरिकने हे हल्ले हवाई दलाच्या सर्वात प्रगत लढाऊ जेट बी२ बॉम्बर्सने केले. या बॉम्बर्सनी या तीन ठिकाणी हजारो किलोग्रॅमचे बॉम्ब टाकले आहेत, असे म्हटले जात आहे. विशेषतः बंकर बस्टर बॉम्ब म्हणून ते प्रसिद्ध आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील कोणत्याही सैन्याकडे ही क्षमता नव्हती, असा दावा केला आहे. या बॉम्बला एमओपी म्हणजेच मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटर (MOP) असेही म्हणतात. या बॉम्बची वैशिष्टये जाणून घेऊ या.
काय आहे एमओपी
एमओपी एक 30,000 पाउंड वजनाचा बॉम्ब आहे. अंडरग्राउंड ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याचा वापर होतो. शेकडो फूट जमिनीच्या आत घुसण्याची त्याची क्षमता आहे. त्यानंतर जमिनीत जाऊन स्फोट करतो. त्यामुळे बंकरमध्ये असलेली जागा पूर्णपणे उद्ध्वस्त होते. हा बॉम्ब अतिशय मजबूत स्टीलच्या मिश्र धातूपासून बनलेला आहे.
अमेरिकन हवाई दलाच्या माहितीनुसार, एमओपी बॉम्ब जीपीएस गाइडेड आहे आणि ते फक्त बी-२ स्पिरिट स्टील्थ बॉम्बरनेच टाकता येते. बी ३ बॉम्बर रडारलाही चकमा देत लांबच्या टप्पाही गाठू शकते. हवेत इंधन भरुन लक्ष्यापर्यंत जात असते.
जमिनीत 200 फूट जाऊ शकतो
आतापर्यंत एमओपी बॉम्ब वापरल्याची अधिकृत माहिती सार्वजनिक केली गेली नाही. लष्करी तज्ज्ञांनुसार, हा बॉम्ब आधीच्या तुलनेत अधिक प्रगत झाला आहे. हा बॉम्ब जवळपास २०० फूट जमिनीत जाऊन स्फोट घडवून आणतो. मागील २० वर्षांत त्याच्यात अनेक बदल करुन त्याची क्षमताही वाढवली आहे.
फोर्डोला का केले लक्ष्य?
अमेरिका आणि इस्त्रायलला माहिती होते की, इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखायचे असेल, तर तेहरानपासून १२५ किलोमीटर अंतरावर डोंगरात सुमारे ३०० फूट खोलीवर बांधलेला फोर्डो प्रकल्प नष्ट करावा लागेल. हे केवळ १४ टन वजनाचा एमओपीनेच शक्य होणार होते. ते २०० फूट जमिनीत प्रवेश करण्यास सक्षम आहे. इस्रायलकडे हे बॉम्ब नाहीत. त्यामुळे अमेरिकेकडून त्याचा वापर करण्यात आला.
