US-Israel Iran News LIVE : दुबईत अडकलेल्या नागरिकांची भारतात घरवापसी, विशेष विमानाने परतले

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला असून, पश्चिम आशियात युद्ध भडकले आहे. इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून जागतिक तेल आणि सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. युद्धासंबंधी आणि देशातील, राज्यांमधील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या या ब्लॉगमध्ये...

US-Israel Iran News LIVE : दुबईत अडकलेल्या नागरिकांची भारतात घरवापसी, विशेष विमानाने परतले
| Updated on: Mar 03, 2026 | 10:23 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 03 Mar 2026 10:50 AM (IST)

    ग्रहणामुळे धुळवडच्या कोंबड्या विक्रीला फटका

    धुळवड निमित्ताने मटण आणि कोंबड्यांवर ताव मारला जातो, मात्र धुळवडच्या दिवशीच ग्रहण आल्याने त्याचा फटका कोंबड्या विक्रीला बसल्याचं पाहायला मिळतंय. धूळवड निमित्ताने सांगलीत ठीक-ठिकाणी देशी कोंबड्याला मोठी मागणी असते,कोंबड्यांचे दर देखील मटणापेक्षा अधिक आहेत. पाचशे रुपयांपासून तब्बल 1500 पर्यंत कोंबड्यांचा दर आहे. मात्र धुळडच्या दिवशीच ग्रहण आल्याने कोंबड्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने, त्याचा फटका कोंबड्या विक्रीवर झाल्याचे पाहायला मिळतोय. विटा या ठिकाणी चौका चौकात कोंबड्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात विक्रेते दाखल झाले होते, मात्र कोंबड्या खरेदीला ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

  • 03 Mar 2026 10:40 AM (IST)

    केज तालुक्यातील विडा गावातुन धुलीवंदनानिमित्त जावयाची गदर्भ सवारी, 90 वर्षांपासूनची परंपरा कायम

    बीडच्या केज तालुक्यातील विडा येथे गेल्या 90 वर्षांपासून कुठलाही एक जावई शोधून गावात आणला जातो आणि त्या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. आनंतराव देशमुख यांनी 90 वर्षांपुर्वी स्वतः च्या जावयाची चेष्टामस्करीत गाढवावरून मिरवणूक काढली होती, तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. दरवर्षी आठ दिवस अगोदर पासूनच जावयाच्या शोधासाठी गावातील तरुण फिरत असतात. यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची मिरवणूक काढून कपडे आणि सोन्याची अंगठी दिली जाते. मात्र यावर्षी सोन्याचे भाव वाढल्याने केवळ कपड्याचा आहेर जावयाला दिला जाणार आहे.
    स्व.अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावर्षीचा मान शिवाजी गालफाडे या जावयाला मिळाला.

  • 03 Mar 2026 10:30 AM (IST)

    जळगाव छत्रपती संभाजी नगर महामार्गावर गांजाची तक्सरी करणाऱ्या वाहनावर पोलिसांची कारवाई

    जळगाव छत्रपती संभाजी नगर महामार्गावर गांजाची तक्सरी करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई केली आहे.  दोन वाहनासह गांजा जप्त, जप्त गांजाची किंमत लाखो रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

  • 03 Mar 2026 10:20 AM (IST)

    पुण्यात सकाळपासूनच धुलिवंदनाचा रंगोत्सव उत्साहात…

    पुण्यात सकाळपासूनच धुलिवंदनाचा रंगोत्सव उत्साहात सुरु आहे.  लहान मुलांना पासून युवकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. पुण्यात सर्वत्र जोष जल्लोष आणि उत्साह धुळवडीच्या निमित्ताने तरुण-तरुणीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने विशेष मुलांसाठी तसेच तरुण तरुणींसाठी भव्य रंगोत्सवाचे आयोजन केलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, महापौर मंजुषा नागपूर धुलिवंदन महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत.

  • 03 Mar 2026 10:06 AM (IST)

    आरोग्य विमाच्या कॉन्फरन्ससाठी गेलेले राज्यतील सुमारे 400 विमा प्रतिनिधी दुबईत अडकले

    आरोग्य विमाच्या कॉन्फरन्ससाठी गेलेले राज्यतील सुमारे 400 विमा प्रतिनिधी दुबईत अडकले. दुबई सरकारकडून अडकलेल्या भारतीयांची मोफत राहण्याची व्यवस्था केली आहे.  विमा कंपनीतर्फे आयोजित कॉन्फरन्ससाठी सोलापूरसह राज्यभरातील 370 विमा प्रतिनिधी 27 फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते. यामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 43 लोकांचा समावेश आहे. हे सर्व विमा प्रतिनिधी आज मायदेशी भारतात परतणार होते मात्र इराण-इजराईल युद्धमुळे भारतकडे येणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द झालेत. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत या सर्व लोकांना दुबईतच थांबावं लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या विमा प्रतिनिधिनी केलीय.

  • 03 Mar 2026 09:50 AM (IST)

    अमेरिकन दूतावासावर अत्यंत मोठा हल्ला

    इराणकडून साैदीतील अमेरिकन दूतावासावर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. अमेरिकन दूतावासावर एका मागून एक हल्ले केली जात आहेत.

  • 03 Mar 2026 09:40 AM (IST)

    गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनावर पोलिसांची कारवाई

    दोन वाहनासह गांजा जप्त, जप्त गांजाची किंमत लाखो रुपये असल्याची माहिती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलिसांची संयुक्त कारवाई. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने नमुने तपासणीसाठी घेतले आहेत

  • 03 Mar 2026 09:30 AM (IST)

    दुबईत अडकलेल्या भारतीयांना राज्य सरकारची मदत

    दुबईत अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी राज्य सरकार पुढे सरकले असून राज्य सरकारकडून मदत पोहोचवली जात आहे.

  • 03 Mar 2026 09:20 AM (IST)

    इराणकडून फतेह 2 मिसाईलचा वापर

    इराण, अमेरिका आण इस्त्रायल यांच्यातील युद्ध पेटले असून इराणकडून थेट फतेह 2 मिसाईलचा वापर हल्ला करण्यासाठी करण्यात आला आहे.

  • 03 Mar 2026 09:05 AM (IST)

    इराकमध्ये लोक आक्रमक अमेरिकन दूतावास कार्यालय टार्गेटवर

    इराकमध्ये लोक आक्रमक झाले असून अमेरिकन दूतावास कार्यालयावर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. अमेरिकेन दूतावास कार्यालयाला टार्गेट केले जात आहे.

  • 03 Mar 2026 08:56 AM (IST)

    मध्यपूर्व आशियात बुलढाण्याचे सहा नागरिक अडकले; जिल्हा प्रशासनाकडून संपर्काचे आवाहन

    मध्यपूर्व आशियातील विविध देशांमध्ये विमान सेवा रद्द झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सहा नागरिक तिथेच अडकून पडले आहेत. सायली दांडगे, रमेश उबरहंडे, गणेश उबरहंडे, बद्रीश्वर पवार, डॉ. पूजा लोखंडे आणि काश्मिरा शाह अशी या व्यक्तींची नावे आहेत. या परिस्थितीची दखल घेत बुलढाणा जिल्हा प्रशासनाने तातडीने या सर्वांशी संपर्क साधला असून, सर्वजण सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. परदेशात अडकलेल्या या नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास त्यांनी तातडीने संबंधित देशातील भारतीय दूतावासाशीसंपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • 03 Mar 2026 08:46 AM (IST)

    इराण-इस्रायल युद्धामुळे इंधन दरवाढीची टांगती तलवार; मुंबईत सध्या पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

    इराण आणि इस्रायलमधील लष्करी संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत सध्या पेट्रोलचे दर १०३ रुपये ५० पैसे तर डिझेलचे दर ९० रुपये प्रति लिटरवर स्थिर असले तरी, येत्या काळात यात मोठी वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. आखाती देशांतील तणावामुळे इंधन आयातीचा खर्च वाढल्यास त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होईल, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. सध्यातरी देशांतर्गत किमती ‘जैसे थे’ असल्या तरी जागतिक घडामोडींमुळे इंधन दरवाढीचे संकट गडद होत आहे.

  • 03 Mar 2026 08:36 AM (IST)

    युद्ध लवकर थांबणार नाही, अमेरिका प्रदीर्घ लढाईसाठी तयार; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य करताना हे युद्ध लवकर संपण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. हे युद्ध लवकर थांबणार नाही. ते किमान आणखी चार ते पाच आठवडे सुरू राहू शकते,” असे स्पष्ट संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. इराणच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका प्रदीर्घ काळ लष्करी मैदानात उतरण्यास सज्ज आहे, असा इशाराही त्यांनी दिला. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.

  • 03 Mar 2026 08:26 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील १२३ नागरिक दुबईत सुरक्षित, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

    पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने मोठी माहिती दिली आहे. १ ते २ मार्च दरम्यान दुबईत अडकलेल्या पुणे जिल्ह्यातील एकूण १२३ नागरिकांशी जिल्हा प्रशासनाने यशस्वीरित्या संपर्क साधला असून, हे सर्व नागरिक सुरक्षित असल्याची खात्री पटली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणेकरांना आवाहन केले आहे की, आखाती देशात असलेल्या आपल्या नातेवाईकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती हवी असल्यास किंवा मदतीची गरज असल्यास तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

  • 03 Mar 2026 08:16 AM (IST)

    आखाती देशातील युद्धाचा नाशिकच्या कांदा आणि द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका

    पश्चिम आशियातील युद्धाचे पडसाद आता थेट महाराष्ट्रातील शेतीवर उमटू लागले आहेत. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे नाशिकच्या कांदा आणि द्राक्ष निर्यातीला मोठा ब्रेक लागला आहे. सध्या JNPT (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) बंदरावर नाशिकहून आलेले कांदा आणि द्राक्षाचे तब्बल २०० कंटेनर अडकून पडले आहेत. शनिवारी रात्रीपासून दुबई बंदरावर नवीन रजिस्ट्रेशन बंद झाल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • 03 Mar 2026 08:09 AM (IST)

    दुबईत अडकलेल्या शेकडो भारतीयांची सुखरूप घरवापसी; विशेष विमानाने मुंबईत आगमन

    पश्चिम आशियातील युद्धाचा वणवा पेटल्यानंतर दुबई विमानतळावर झालेल्या हल्ल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तिथे अडकलेल्या भारतीय प्रवाशांचा जीव अखेर भांड्यात पडला आहे. दुबई विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द झाल्याने शेकडो भारतीय प्रवासी तिथेच अडकून पडले होते. या प्रवाशांची दोन दिवस स्थानिक हॉटेल्समध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेऊन भारत सरकार आणि अमिरेट्स (Emirates) विमान कंपनीच्या समन्वयाने एका विशेष विमानाचे आयोजन करण्यात आले. हे विशेष विमान आज पहाटे ३ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. आपल्या मायदेशात सुखरूप पोहोचल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, अनेकांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.

  • 03 Mar 2026 08:04 AM (IST)

    सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासावर इराणचा भीषण ड्रोन हल्ला; इमारतीला मोठी आग

    इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाचा बदला घेण्यासाठी इराणने आक्रमक पाऊल उचलले असून, सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील अमेरिकन दूतावासाला लक्ष्य केले आहे. इराण समर्थित गटांनी केलेल्या या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात दूतावासाच्या इमारतीचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे यापरिसरात भीषण आग लागली आहे. या हल्ल्याच्या वेळी दूतावास रिकामी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे, मात्र या घटनेमुळे आखाती देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.

पश्चिम आशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील थेट लष्करी संघर्ष सुरु आहे. २८ फेब्रुवारी २०२६ पासून अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील लष्करी तळ, क्षेपणास्त्र केंद्रे आणि अण्वस्त्र प्रकल्पांना टार्गेट केले. इराणनेही या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलसह आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. या युद्धामुळे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या संघर्षाचा परिणाम केवळ आखाती देशांवरच नाही, तर जागतिक शेअर बाजार, सोन्याचे दर आणि कच्च्या तेलाच्या किमतींवरही होत आहे. या युद्धामुळे विमान सेवांवर मोठा परिणाम झाला असून दुबई, सौदी आणि कुवेतला जाणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत. भारतासह जगभरात या घटनेचे पडसाद उमटत आहेत. या युद्धाची प्रत्येक ताजी अपडेट, दोन्ही देशांच्या लष्करी हालचाली आणि भूमिका जाणून घेण्यासाठी आमच्या या लाईव्ह ब्लॉगला फॉलो करा.

Follow Us