War Update : तुम्हालाही अमेरिका-इराण युद्धाची झळ बसणार, भारतीय अर्थव्यवस्थेवर असा परिणाम होणार

War impact on India : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. आता या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे. भारतालाही याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

War Update : तुम्हालाही अमेरिका-इराण युद्धाची झळ बसणार, भारतीय अर्थव्यवस्थेवर असा परिणाम होणार
War Iran vs US
Image Credit source: Google
| Updated on: Feb 28, 2026 | 5:03 PM

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्याने युद्धाला सुरूवात झाली आहे. त्यानंतर इराणकडूनही पलटवार करण्यात आला असून इराणने अमेरिकेच्या अनेक लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. तसेच इस्रायलच्या 4 बड्या शहरांवरही क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत. अशातच आता या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे. भारतालाही याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. या युद्धामुळे भारताला काय फटका बसू शकतो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार

अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे युद्धामुळे कच्च्या तेलाची पुरवठा साखळी खंडित होण्याची शक्यता आहे. याचा मोठा परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे. कारण भारताच्या तेलाची 85 टक्के गरज आयातीद्वारे पूर्ण होते. त्यामुळे जर कच्च्या तेलाच्या किमतीत एका डॉलरचीही वाढ झाली तर भारताचे वार्षिक आयात बिल 9000 कोटींनी वाढेल आणि याचा थेट अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांवर परिणाम होईल. त्याचबरोबर बासमतीसह अनेक कृषी वस्तूंच्या निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो.

भारत इराण व्यापाराला फटका

अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे भारत आणि इराणमधील व्यापार कमी झाला आहे. 2024-25 आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील एकूण व्यापार अंदाजे 1.68 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता. यापैकी भारताने 1.24 अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीच्या वस्तूंची निर्यात केली होती. तर इराणमधून भारताने 0.44 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आयात केली होती. मात्र आता या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या किमती 91 डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, जागतिक तेल उत्पादनात इराणचा वाटा 4-5% आहे. त्यामुळे जागतिक पुरवठ्यात घट झाल्यास तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते. त्यामुळे भारताला वाढीव दराने कच्चे तेल खरेदी करावे लागू शकते. यामुळे भारताची वित्तीय तूट वाढेल आणि भारतीय रुपयाच्या मूल्यावर दबाव येईल. सध्या जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे 71 अमेरिकन डॉलर्स आहेत. मात्र हे युद्ध असेच सुरू राहिले तर तेलाच्या किमती 91 डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे देशातील इंधनाच्या किमती वाढू शकतात, यामुळे महागाई वाढेल आणि याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू शकतो.

Follow Us