India-Iran Trade : इराणसोबत जे बिझनेस करतील त्यांच्यावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ, ट्रम्प यांच्या नव्या धमकीचा भारताला किती फटका बसेल?
India-Iran Trade : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफ अस्त्र उगारलं आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याची त्यांनी धमकी दिली आहे. असं झाल्यास भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या साहित्यावर एकूण 75 टक्के टॅरिफ लागेल. भारताला याचा काय आणि किती फटका बसणार? समजून घ्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेनेजुएलावरील हल्ल्यानंतर पुन्हा एकदा टॅरिफ अस्त्र उगारलं आहे. दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून त्यांनी टॅरिफचा खेळ सुरु केलाय. इराणमध्ये सरकार विरोधात सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान त्यांनी एक फरमान जारी केलं आहे. जो कुठला देश इराणसोबत व्यापार करेल त्यांच्यावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ आकारला जाईल. याचा सर्वाधिक परिणाम ब्राझील, चीन या देशांवर होईल. भारतावरही या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. भारत आणि इराणमध्ये आता व्यापारी संबंध कसे आहेत? दोन्ही देशांमध्ये किती आयात-निर्यात होते?
इराण भारताचा ट्रेड पार्टनर आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणसोबत बिझनेस करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावला आहे. भारतावर याचा बऱ्यापैकी परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या सामानावर ट्रम्प प्रशासनाने आधीच 25 टक्के टॅरिफ लावला आहे. रशियाकडून तेल खरेदीसाठी अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ आहेत. आता इराणसोबत व्यापार केल्यास भारतावरील टॅरिफ 75 टक्क्यांच्या घरात जाईल.
भारत कुठल्या वस्तुंची इराणला निर्यात करतो?
भारत आणि इराणमध्ये दीर्घकाळापासून उत्तम व्यापारी संबंध आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासानुसार, अलीकडच्या काही वर्षात भारताच्या पाच सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी इराण एक आहे. भारतातून इराणला काय-काय निर्यात होतं ते समजून घेऊया. बासमती तांदूळ, चहा, साखर, ताजी फळं, औषध, सॉफ्ट ड्रिंक, काजू, शेंगदाणे, मांस, डाळी आणि अन्य सामानाचा यात समावेश होतो. भारत इराणमधून ज्या साहित्याची आयात करतो, त्यामध्ये मेथनॉल, पेट्रोलियम बिटुमेन (रस्ता बनवण्याचं साहित्य), सफरचंद, लिक्विफाइड प्रोपेन गॅस, खजूर, बदाम या वस्तू आहेत.
किती अब्ज डॉलरचा व्यापार
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारत आणि इराणमध्ये एकूण व्यापार 2.33 अब्ज डॉलरचा होता. गतवर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 22 टक्के जास्त होतं. भारताने इराणला 1.66 अब्ज डॉलरच्या सामानाची विक्री केली. इराणकडून 672.12 मिलियन डॉलरचं सामान विकत घेतलं. एप्रिल 2023 ते जुलै 2023 दरम्यान दोन्ही देशांमध्ये एकूण 660.70 मिलियन डॉलरचा व्यापार झाला. यात भारताची निर्यात 455.64 मिलियन डॉलरची होती. आयात 205.14 मिलियन डॉलरची होती.
