भारताला ऑफर झालेल्या F-35 मध्ये असं काय खास? ज्यामुळे चीन-पाकिस्तानची आत्ताच झोप उडालीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प यांनी सुद्धा मोदींसोबतच्या खास मैत्रीचा उल्लेख केला. ट्रम्प यांनी यावेळी भारताला त्याचं सर्वात अत्याधुनिक F-35 फायटर विमान विक्रीचा प्रस्ताव दिला. या ऑफरमुळे चीन-पाकिस्तानची झोप का उडलीय? ते जाणून घ्या.

अमेरिका भारताला जगातील सर्वात खतरनाक स्टेल्थ फायटर जेट F-35 देण्यास तयार आहे. अमेरिकेने भारतासमोर F-35 विक्रीचा प्रस्ताव मांडला आहे. अमेरिकेच्या या ऑफरमुळे चीन-पाकिस्तानात अस्वस्थतता निर्माण झाली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषेदत ट्रम्प यांनी F-35 देण्याची आमची तयारी असल्याची घोषणा केली. ही डील पुढे सरकल्यास इंडियन एअर फोर्सची ताकद कैकपटीने वाढेल. संपूर्ण आशिया खंडात सैन्य संतुलन बदलणारा हा निर्णय आहे.
“आम्ही भारतासोबत अब्जावधी डॉलर्सचे सैन्य करार वाढवणार आहोत. त्यात F-35 स्टेल्थ फायटर जेट सुद्धा आहे” असं ट्रम्प प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले. अमेरिकेच्या सैन्य शक्तीमध्ये या विमानाची महत्त्वाची भूमिका आहे. अनेक युद्धात या विमानाने आपली घातक क्षमता दाखवून दिली आहे. भारताचा मुख्य प्रतिस्पर्धी चीनने आधीच दोन पद्धतीचे 5th जनरेशन फायटर जेट्स तयार केले आहेत. जगातील फक्त तीन देशांकडे अमेरिका, चीन आणि रशिया यांच्याकडे स्टेल्थ टेक्नोलॉजीच फायटर विमान आहे.
भारतासमोरची रणनितीक आव्हानं मोठी
पाकिस्तानने चीनकडून अत्याधुनिक फायटर जेट्स विकत घेण्याची योजना बनवली आहे. त्यामुळे भारतासमोरील रणनितीक आव्हानं वाढत आहेत. F-35 ची ताकद चीन-पाकिस्तानकडे असलेल्या फायटर विमानांपेक्षा कैकपटीने अधिक आहे. म्हणूनच भारताला मिळालेली ही ऑफर ऐकून चीन-पाकिस्तानच टेन्शन वाढलं आहे.
F-35 का इतकं घातक विमान मानलं जातं?
F-35 पाचव्या पिढीच स्टेल्थ फायटर जेट आहे. सुपरसॉनिक स्पीडने उड्डाण करण्याची क्षमता त्याशिवाय हे विमान रडारलाही सापडत नाही. या विमानात अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टम, हाय-टेक सेंसर आणि ओपन आर्किटेक्चर आहे. F-35 हे फक्त एक फायटर विमान नाहीय, तर आधुनिक युद्धकलेच घातक शस्त्र आहे. हे जगातील सर्वात लेटेस्ट अत्याधुनिक फायटर विमान मानलं जातं. रडारला सापडत नसल्यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर घुसून हल्ला करण्याची या विमानाची क्षमता आहे.
F-35 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित सेंसर सिस्टम आहे. याद्वारे पायलटला 360-डिग्री व्यू आणि शत्रुच्या हालचालींची माहिती मिळते. ड्रोनप्रमाणे हे विमान स्वत: डेटा एनालिसिस करतं आणि पायलटला धोक्याबद्दल आधीच अलर्ट करतं.