भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या युवकाला व्हॉट्सअपने दिले नवजीवन; लोकेशन शेअर केल्याने सुरक्षित निघाला
बोरान कुबत म्हणाला, जो कुणी या व्हॉटस्अपचे लोकेशन पाहत असेल, त्यांनी कृपया मदत करावी. हा व्हिडीओ पाहून बचाव पथकातील चमूने इमारतीखालील मलबा काढून त्यांचे प्राण वाचविले. बोरान आणि त्याची आई जीवंत बाहेर पडले.

अंकारा : तुर्कीत झालेल्या भूकंपात (Turkey Earthquake) कित्तेक लोकं मलब्याखाली दबले. इमारतींच्या खाली लोकं गाडले गेलेत. सोशल मीडिया साईटवरून लोकेशन शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळं काही लोकांचे प्राण वाचले. लोकेशनवरून काही लोकांची माहिती मिळाली. त्यामुळं मदतकार्य करता आले. एका विद्यार्थ्याने व्हॉट्सअपचा वापर करून त्याची आई आणि त्याचे स्वतःचे प्राण वाचविले. व्हॉट्सअपवरील व्हिडीओतून लोकेशन शेअर केला. तुर्कीच्या पूर्व भागात ढिगाऱ्याखाली २० वर्षीय युवकाला सोशल मीडियाचा ((Social Media)) वापर केल्याने जीवनदान मिळाले.
मायलेकाने घेतला इमारतीचा आसरा
बोरान कुबत असे या युवकाचे नाव आहे. बोरान आईसोबत इस्तांबूल येथून मालत्या येथे आला होता. सोमवारी झालेल्या भूकंपात ते सापडले. सकाळी झालेल्या भूकंपात वाचल्यानंतर त्या मायलेकाने इमारतीचा आसरा घेतला. पण, त्यानंतर ७.५ रेश्टल स्केलचा भूकंप आला. त्यात ही इमारत पत्त्यासारखी कोसळली.
बोरानने मदतीचे केले आवाहन
या इमारतीखाली आपल्या नातेवाईकांसोबत बोरान दबला गेला. तिथून त्याने आपल्या मित्राला माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. बोरानने मदतीचे आवाहन करत व्हाॉट्सअपवरून आपले लोकेशन शेअर केले. एक व्हिडीओ शेअर करून त्याने मित्राला व्हॉट्सअपवर टाकला.
व्हिडीओतून मदतीचे आवाहन
बोरान कुबत म्हणाला, जो कुणी या व्हॉटस्अपचे लोकेशन पाहत असेल, त्यांनी कृपया मदत करावी. हा व्हिडीओ पाहून बचाव पथकातील चमूने इमारतीखालील मलबा काढून त्यांचे प्राण वाचविले. बोरान आणि त्याची आई जीवंत बाहेर पडले.
काका, काकी मलब्याखाली
बोरानने तुर्कीच्या सरकारी एजंसीला सांगितलं की, इमारतीखालील नेमकी जागा शोधण्यासाठी शोधपथकाला हातोड्याने चार-पाच ठिकाणी ठोकून पाहावे लागले. काका आणि त्याची काकी या इमारतीच्या मलब्याखाली गाडले गेले. सध्या सीरिया आणि तुर्की येथे भूकंपातील पीडित लोकांना मदतीचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहे.
९० तासानंतर महिलेला बाहेर काढले
हाते येथे भूकंपानंतर ९० तासांनी एका महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तसेच भूकंपाच्या ४५ तासांनंतर एका मुलीला मलब्यातून जीवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश मिळाले. अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या भूकंपाची मोठ्या प्रमाणात झळ स्थानिक नागरिकांना बसली आहे.
तुर्की आणि सीरियात सोमवारी आणि मंगळवारी भूकंप आला. यात सुमारे ८ हजार लोकांचा जीव गेला. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप एर्दोगन यांनी १० प्रांतात तीन महिन्यांसाठी आपातकालीन परिस्थिती जाहीर केली.
