Explained : भारताला जे जमलं, ते इराणला S-300 एअर डिफेन्स सिस्टिम असूनही का शक्य झालं नाही? समजून घ्या
Explained : भारताकडे रशियाची S-400 एअर डिफेन्स सिस्टिम आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानने डागलेली बॅलेस्टिक मिसाइल्स आपण याच शस्त्राचा वापर करुन पाडली. तशीच इराणकडे S-300 एअर डिफेन्स सिस्टिम आहे, मात्र त्यांना इस्रायलचा हल्ला रोखता आला नाही. का ते अपयशी ठरले समजून घ्या.

मध्य पूर्वेमध्ये इराण आणि इस्रायल दरम्यानच्या तणावाने टोक गाठलं आहे. इस्रायलने इराणचे अण्विक तळ आणि सैन्य ठिकाणांवर हल्ले केले. इराणला या बद्दल दोन ते तीन दिवस आधीच इशारा मिळाला होता. इराणकडे एअर डिफेन्स सिस्टिम असूनही इस्रायलचे हल्ले रोखण्यात ते अपयशी ठरले. इराणची एअर डिफेन्स सिस्टिम आणि इस्रायली हल्ल्याची रणनिती समजून घेऊया. इराणने आपली हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी अनेक अत्याधुनिक प्रणाली विकसित केल्या आहेत. शत्रूचा हवाई हल्ला अयशस्वी करण्यासाठी ही एअर डिफेन्स सिस्टिम आहे.
S-300 : इराणने रशियाकडून ही एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेतली आहे. 150 किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्याला टार्गेट करण्याची हा सिस्टिमची क्षमता आहे. उंचावरुन उडणारी विमान, मिसाइल्स आणि डोन्सना रोखण्यासाठी सक्षम आहे. इराणकडे जवळपास 4 ते 6 S-300 च्या बॅटरी आहेत. प्रमुख शहरं आणि सैन्य तळाच्या रक्षणासाठी ही सिस्टिम तैनात आहे.
बवर (Bavar-373) : ही इराणची स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिम आहे. बवरला S-300 चा पर्याय म्हणून मानलं जातं. 200-250 किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्याला पाडण्यासाठी ही सिस्टिम सक्षम आहे. मिसाइल्स सुद्धा पाडू शकते. 2019 साली ही सिस्टिम तैनात करण्यात आली. पण Bavar-373 किती प्रभावशाली आहे? या बद्दल नेहमीच प्रश्न उपस्थित झालेत. त्याशिवाय इराणकडे अजून सुद्धा काही एअर डिफेन्स सिस्टिम आहेत.
इराणने आपले अणवस्त्र तळ आणि सैन्य ठिकाणांजवळ या सर्व एअर डिफेन्स सिस्टिम तैनात केल्या होत्या. त्याशिवाय आपली रडार सिस्टिम आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंग सिस्टिमही मजबूत केली, जेणेकरुन शत्रूच्या कम्युनिकेशनमध्ये अडथळा येईल.
पण एवढं असून इराणला इस्रायलचा हल्ला का रोखता आला नाही? इस्रायलने काय टेक्नोलॉजी आणि रणनिती वापरली? समजून घ्या.
स्टेल्थ टेक्निक (Stealth Technology) : इस्रायलने या हल्ल्यासाठी आपली F-35 विमानं वापरली. यात स्टेल्थ टेक्नोलॉजी आहे, म्हणजे रडारला ही फायटर जेट्स दिसत नाहीत. F-35 चा वेग आणि उंची बदलण्याच्या क्षमतेने इराणची एअर डिफेन्स सिस्टिमला गोंधळात टाकलं.
ड्रोन आणि मिसाइल : इस्रायलने ड्रोन आणि क्रूज मिसाइल्स वापरली. जे कमी उंचीवरुन उडतात आणि रडारला दिसत नाहीत. या मिसाइल्सना अनेक दिशांमध्ये एकाचवेळी लॉन्च केलं. त्यामुळे इराणच्या एअर डिफेन्स सिस्टिमवरील दबाव वाढला.
सायबर अटॅक : इस्रायलने इराणचे रडार आणि कम्युनिकेशन सिस्टिमवर सायबर हल्ले केले. त्यामुळे त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम काहीवेळासाठी निष्क्रिय झाली. त्यामुळे त्यांना हे समजलच नाही की, कधी आणि कुठून हल्ला होतोय.