पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये 20 वर्षे तुरुंगवास, अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढून करायचा लैंगिक शोषण
Pune Youth 20 Years Prison in France: पुण्यातून फ्रान्समध्ये शिक्षणासाठी गेलेल्या एका तरुणाला स्थानिक न्यायालयाने बाल लैंगिक शोषण प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा सुनावली. तो संबंधित गँगचा म्होरक्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

Pune Youth 20 Years Prison in France: राज्यातील पुणे येथून फ्रान्समध्ये शिक्षणासाठी गेलेल्या एका तरुणाला स्थानिक न्यायालयाने 20 वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली. रोहन राणे (वय 29) असे या मुख्य आरोपीचे नाव आहे. राणे हा आंतरराष्ट्रीय बाल लैंगिक शोषण आणि छळ करणाऱ्या ऑनलाईन टोळीचा म्होरक्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. खटल्यातही त्याच्यावर हाच आरोप होता. या गंभीर गुन्ह्यात फ्रान्समधील कायद्यान्वये त्याला कमाल शिक्षा झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
डिस्कॉर्डचा वापर करून लैंगिक छळ
प्राप्त माहितीनुसार, रोहन राणे हा उच्च शिक्षणासाठी फ्रान्समध्ये राहत होता. त्याने यादरम्यान डिस्कॉर्ड या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत जगभरातील अल्पवयीन मुलांना आपल्या जाळ्यात ओढले. सीव्हीएलटी (CVLT) नावाच्या एका गुन्हेगारी ऑनलाईन गटाच्या माध्यमातून तो या अल्पवयीन मुलांवर दबाव टाकत असे. या मुलांकडून ही टोळी हिंसक आणि लैंगिक स्वरुपाचे व्हिडिओ तयार करून घेत होती. याविषयीचे टास्क या मुलांना देण्यात येत होते.
या रॅकेटविषयी अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला अगोदर माहिती मिळाली होती. अमेरिकन अधिकाऱ्यांनी ही गोपनीय माहिती फ्रान्स पोलिसांना दिली. इनपूट आधारे 2021 मध्ये फ्रान्समधील आंतिब या शहरातून पोलिसांनी रोहन राणे याला अटक केली. त्यानंतर न्यायालयात खटला चालवण्यात आला. दोन्ही बाजूंच्या प्रदीर्घ युक्तीवादानंतर, डिजिटल पुराव्यांआधारे न्यायालयाने रोहनला दोषी ठरवले. लहान मुलांचे लैंगिक शोषण, छळ आणि सायबर गुन्हेगारी प्रकरणात रोहनला 20 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली गेली. या टोळीतील इतर सदस्यांना अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. या घटनेने भारतीय सुरक्षा यंत्रणांनाही धक्का बसला आहे.
मुलांनी दाखवले धाडस
या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये भारत, अमेरिका, जर्मनी आणि न्यूझीलंडमधील काही तरुणांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणात जागतिक स्तरावर 20 हून अधिक पीडित मुलांची ओळख पटवण्यात आली. यापैकी 6 पीडितांनी जे सज्ञान आहेत, त्यांनी न्यायालयात जाऊन साक्ष दिली. या टोळीतील इतर सदस्यांना अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. खटल्यादरम्यान सरकारी वकिलांनी रोहन राणे याला 30 वर्षे शिक्षेची मागणी केली होती. सुनावणीअंती न्यायालयाने त्याला 20 वर्षे कमाल शिक्षा ठोठावली.
