CJP Jantar Mantar Protest: झुरळांचा आवाज संयुक्त राष्ट्रापर्यंत, दिल्लीतील सीजेपी आंदोलनाची मोठी दखल, आंदोलनकर्त्यांना तात्काळ सोडा…
United Nations On CJP Jantar Mantar Protest: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन चिरडण्याचा काल प्रयत्न झाला. पोलिसांनी अगोदरच नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली. तरीही प्रदर्शन झाले. त्याची दखल संयुक्त राष्ट्रानेही घेतली.

दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीने प्रदर्शन केले. प्लॅन बी नुसार CJP च्या पुढील नेतृत्वाने आंदोलनाची पुढील सूत्रं हाती घेतली. त्यापूर्वी काल सकाळी आणि दुपारपर्यंत सीजेपीच्या प्रमुख नेत्यांची धरपकड करण्यात आली. पोलिसांनी अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेतले. पण आंदोलकांनी दिल्लीत आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोध दर्शवला. दिल्लीतील या घडामोडींची संयुक्त राष्ट्राने (United Nations) दखल घेतली. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार कार्यालयाने शनिवारी या घाडमोडींवर चिंता व्यक्त केली. कार्यकर्त्यांना आंदोलनाचा हक्क, अधिकार असल्याचे आणि सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी शांततापूर्णरित्या जमा होण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. काल पोलिसांनी हजारो आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांना तात्काळ सोडण्याची आग्रही भूमिका संयुक्त राष्ट्राने मांडली. पोलिसांनी कालच काही आंदोलकांची सुटका केली आहे.
संयुक्त राष्ट्र संघाकडून चिंता व्यक्त
संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार कार्यालयाचे प्रवक्ते थमीम अल खीथान यांनी याविषयीची भूमिका मांडली. दिल्लीत काल आंदोलन होण्यापूर्वी आणि आंदोलनादरम्यान आंदोलक नेते, कार्यकर्ते, विविध सामाजिक संगघटनांचे सदस्य, वकील आणि पत्रकारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावर संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली. आम्ही शांततापूर्णरित्या एकत्रित येण्याच्या अधिकारांचा सन्मान करतो आणि सरकारकडूनही तशी अपेक्षा करतो असे खीथान यांनी स्पष्ट केले.
विना अट तात्काळ सुटका करा-UN
अल-खीथान यांनी भारतीय अधिकाऱ्यांना संयम ठेवण्याचे आणि आंदोलनकर्त्यांचा आंदोलनाचा हक्क अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. लोकशाही देशात मानवाधिकाऱ्यांचे हनन होता कामा नये असा सूर संयुक्त राष्ट्र संघाने आळवला. मनमानी पद्धतीने ताब्यात घेतलेल्या सर्व लोकांना विना अट तात्काळ सोडा अशी आग्रही मागणी संयुक्त राष्ट्राने केली आहे.
सीजेपीने जंतरमंतरवर आंदोलनाची तयारी केली होती. पण पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली. काल पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी जागोजागी मोठा कडक बंदोबस्त ठेवला. अनेक ठिकाणी बॅरिकेटिंग केली. नाकेबंदी केली. या परिसरात कोणीच पोहचू नये यासाठी ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर आधुनिक तंत्राचाही वापर करण्यात आला. अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेण्यात आले. तरुणाईच्या आंदोलनाला सरकार घाबरल्याचा पलटवार सीजेपी, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केला. दरम्यान आज पुन्हा सीजेपीचे कार्यकर्ते आणि इतर पक्ष पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
