छत्तीसगडमध्ये पारंपरिक नृत्यातून निवडतात जीवनसाथी? जाणून घ्या ही आगळी वेगळी परंपरा
छत्तीसगडमधील पारंपरिक लोकनृत्य केवळ सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक नसून, ते धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहेत. काही नृत्यांमधून तर तरुण-तरुणी आपल्या जोडीदाराची निवडही करतात. तर चला जाणून घेऊया छत्तीसगडच्या अशाच पाच दुर्मिळ आणि आकर्षक पारंपरिक नृत्यप्रकारांबद्दल.

छत्तीसगड राज्य केवळ निसर्गसौंदर्य, समृद्ध आदिवासी जीवनशैली आणि ऐतिहासिक वारसासाठीच नव्हे, तर तेथील पारंपरिक नृत्य आणि सामाजिक मान्यतांसाठीही प्रसिद्ध आहे. इथे काही असे लोकनृत्य प्रचलित आहेत, जे फक्त मनोरंजनापुरते मर्यादित नसून, सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जातात. विशेष म्हणजे या नृत्यप्रकारांमधूनच अनेक वेळा युवक-युवती आपल्या जीवनसाथीची निवडही करतात. चला जाणून घेऊया छत्तीसगडच्या अशाच पाच दुर्मिळ आणि आकर्षक पारंपरिक नृत्यप्रकारांबद्दल.
सैला नृत्य : सैला नृत्य हे सरगुजा विभागातील आदिवासी लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या नृत्यात युवक गोल रचून काठीने ठेका धरतात आणि समतोल साधत तालावर नृत्य करतात. सहसा हा नृत्यप्रकार हिवाळ्यात, शेतात पीक कापणीनंतर आनंदोत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. यामध्ये सहभाग घेणाऱ्या युवक-युवतींमध्ये परस्पर आकर्षण निर्माण होऊन काही वेळा विवाहाचे बंधही तयार होतात.
ककसार नृत्य : ककसार नृत्य विशेषतः बस्तर जिल्ह्यातील अबुझमाड भागात प्रचलित आहे. हे नृत्य मुरिया जमातीमध्ये प्रसिद्ध आहे. शेतीकामानंतर थकलेल्या शरीराला आणि मनाला ऊर्जा देण्यासाठी स्थानिक युवक-युवती हे नृत्य सादर करतात. यात गाणी, वाद्य आणि एकत्र नृत्य यांचा सुरेख संगम असतो. या प्रसंगी पारंपरिक वेशभूषा आणि अलंकार वापरले जातात.
सुआ नृत्य : सुआ नृत्य हे विशेषतः महिलांमध्ये लोकप्रिय आहे. दिवाळीच्या सुमारास घरोघरी सुआ (पोपट) गीत म्हणत समूह नृत्य सादर केले जाते. महिलांचे हे नृत्य सामाजिक सलोखा, स्त्रीशक्ती आणि आनंदाचा प्रतीक मानले जाते. त्यामध्ये संवादात्मक शैली असते आणि महिला एकमेकांशी विनोदी बोलण्याच्या माध्यमातून सृजनशीलता व्यक्त करतात.
गेड़ी नृत्य : गेड़ी नृत्य हे मुरिया जमातीतील युवक उंच लाकडी गेड्यांवर चढून सादर करतात. यासाठी विशेष कौशल्य आणि संतुलन आवश्यक असते. हे नृत्य आषाढ महिन्यात ‘गेड़ी पर्व’ निमित्ताने मोठ्या उत्साहात केले जाते. पारंपरिक वाद्य, रंगीत वेशभूषा आणि धडाडीमुळे हे नृत्य अत्यंत प्रभावी आणि साहसी वाटते.
सरहुल नृत्य : सरहुल नृत्य हे छत्तीसगडमधील उरांव जनजातीचे पारंपरिक आणि धार्मिक महत्त्व असलेले लोकनृत्य आहे. या नृत्यात देवी-देवतांची आणि पितरांची कृपा प्राप्त व्हावी, तसेच गावात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी प्रार्थना केली जाते. सरहुल सणाच्या निमित्ताने हे नृत्य साजरे केले जाते, जे वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि निसर्गाच्या पुनर्जन्माचे प्रतीक मानले जाते. या नृत्यावेळी पुरुष नर्तक डोक्यावर पारंपरिक पद्धतीने ‘साफा’ बांधतात, तर महिला त्यांच्या जूड्यात बगळ्याच्या पंखांची कलगी खोचतात. पारंपरिक पोशाख, वाद्य आणि गाण्यांच्या साथीनं केले जाणारे हे नृत्य संपूर्ण उरांव समाजाच्या एकतेचं आणि सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवतं. हे नृत्य केवळ एक कला नव्हे, तर एक अध्यात्मिक श्रद्धा आणि परंपरेचा सन्मान देखील आहे.
