मालदीवला जाण्याची गरज नाही? भारतातील हे 5 समुद्रकिनारे मालदीवसारखेच, एकदा बघाल तर प्रेमातच पडाल
भारतातील या बेटांचं सौंदर्य पाहून व्हाल थक्क! निळाशार समुद्र, पांढरी वाळू अन् नारळाची झाडं. लक्षद्वीपमधील 5 सुंदर ठिकाणं. जिथे गेल्यानंतर तुम्ही मालदीव विसरून जाल.

भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश असलेलं लक्षद्वीप आपल्या निसर्गसौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. निळाशार समुद्र, पांढऱ्याशुभ्र वाळूचे किनारे, रंगीबेरंगी खडकांची दुनिया आणि शांत वातावरण यामुळे लक्षद्वीप पर्यटकांना आकर्षित करतं. लक्षद्वीप हे एकच बेट नसून अनेक लहान बेटांचा समूह आहे. तुम्हीही सुट्टीत लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल तर येथील ही पाच सुंदर ठिकाणं नक्की पाहायला हवीत.
1. अगत्ती बेट
लक्षद्वीपमधील पर्यटनाची सुरुवात अगत्ती बेटापासून करता येते. येथे लक्षद्वीपमधील मुख्य विमानतळ असल्यामुळे पर्यटकांसाठी हे बेट महत्त्वाचं आहे. लांबच लांब पसरलेले वाळूचे किनारे आणि स्वच्छ निळं पाणी हे येथील प्रमुख आकर्षण आहे.
2. कवरत्ती बेट
कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी आहे. सुंदर समुद्रकिनारे, पांढरी वाळू आणि नयनरम्य सरोवरासारखे शांत समुद्रभाग म्हणजेच लगून यांसाठी हे बेट प्रसिद्ध आहे. निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवण्यासोबतच समुद्राचं सौंदर्य जवळून अनुभवण्यासाठी कवरत्ती उत्तम ठिकाण आहे.
3. मिनिकॉय बेट
लक्षद्वीपच्या दक्षिण भागात असलेलं मिनिकॉय बेट आपल्या वेगळ्या संस्कृतीसाठी ओळखलं जातं. येथील संस्कृतीवर मालदीवचा प्रभाव दिसून येतो. येथील ब्रिटिश काळात बांधलेला ऐतिहासिक दीपगृहही पर्यटकांचं लक्ष वेधून घेतो. याशिवाय टूना मासेमारी आणि विविध जलक्रीडांसाठीही हे बेट प्रसिद्ध आहे.
4. बंगारम बेट
शांत वातावरणात निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर बंगारम बेटाला भेट देता येते. स्वच्छ निळंशार पाणी, नारळाच्या झाडांनी नटलेला परिसर आणि सुंदर समुद्रकिनारे यामुळे हे बेट पर्यटकांना विशेष भावतं. येथील सूर्यास्ताचं सीन मन मोहून टाकणारा असतो. गर्दीपासून दूर निवांत सुट्टी घालवण्यासाठी हे एक आकर्षक ठिकाण आहे.
5. कल्पेनी बेट
कल्पेनी बेट आपल्या शांत, सुंदर समुद्रकिनाऱ्यां आणि प्रवाळांच्या खडकांसाठी प्रसिद्ध आहे. येथे प्रवाळांचे अवशेषही मोठ्या प्रमाणात आढळतात. समुद्राच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना पर्यटकांना कयाकिंग, सेलिंग आणि रीफ वॉकिंगसारख्या साहसी उपक्रमांचा अनुभव घेता येतो. निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी हे बेट विशेष आकर्षण ठरू शकतं.
लक्षद्वीपची सफर ठरेल अविस्मरणीय
निसर्गसौंदर्य, शांत समुद्रकिनारे, रंगीबेरंगी सागरी जीवसृष्टी आणि वेगळी स्थानिक संस्कृती यांचा अनुभव घ्यायचा असेल, तर लक्षद्वीप हा उत्तम पर्याय आहे.
