
गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात महिसागर नदीवर असलेला एक जुना पूल अचानक कोसळला आणि त्यात अनेक वाहनं नदीत कोसळली. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे हा पूल 1985 मध्ये 100 वर्षे टिकेल असा दावा करून बांधण्यात आला होता, पण केवळ 40 वर्षांतच तो ढासळला. त्यामुळे आता देशभरात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे की पुलांचे आयुष्य नक्की कसं आणि कोण ठरवतं ?
जेव्हा एखाद्या पुलाचं काम सुरु केलं जातं, तेव्हा सर्वप्रथम त्याची DPR (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार केली जाते. त्यामध्ये हा पूल कशासाठी बांधला जात आहे, त्याचा वापर किती होणार आहे, आणि रोज किती वाहतूक या पुलावरून होईल, याचं विश्लेषण केलं जातं. ही माहिती मिळाल्यानंतरच त्याची अंदाजे आयुष्य ठरवली जाते.
उदाहरणार्थ, नदीवरचा पूल असेल तर त्याची जास्तीत जास्त आयुष्य 100 वर्ष मानली जाते. रेल्वे पुलांचंही असंच असतं 100 वर्षं. मात्र हायवेवर बांधले जाणारे पूल प्रामुख्याने 50 वर्षांसाठी डिझाईन केले जातात. या निर्णयामागे त्या पुलावरचा भार, वाहतूक आणि वापराचा अंदाज याचा मोठा रोल असतो.
पूल किती वर्ष टिकेल हे मुख्यतः त्यात वापरलेल्या साहित्यावर आणि डिझाईनवर अवलंबून असतं. पूर्वी लाकडाचे पूल बांधले जात असत, पण त्यांची आयुष्य कमी असल्यामुळे आता त्याचा वापर जवळपास बंद झाला आहे. आजकाल बहुतेक पूल काँक्रीट आणि स्टीलने बनवले जातात. या दोन्ही साहित्यांची टिकाऊपणा जास्त असल्यामुळे पुलाची आयुष्य देखील जास्त असते.
याशिवाय, पूल कसा डिझाईन केला आहे, त्याची रचना किती मजबूत आहे, यावर देखील त्याची आयुष्य ठरते. जर डिझाईनमध्ये त्रुटी असतील, तर पूल लवकर खराब होण्याची शक्यता वाढते.
होय, पुलाची आयुष्य योग्य पद्धतीने वाढवता येते. त्यासाठी गरज आहे नियमित देखभाल आणि वेळोवेळी दुरुस्ती करण्याची. जर पुलाची वेळेवर तपासणी, दुरुस्ती आणि संरचना सुधारणं केलं गेलं, तर तो अधिक काळ टिकू शकतो. बरेच वेळा जुने पूल मजबुतीकरण करून पुन्हा वापरात आणले जातात, यालाच स्ट्रेंथनिंग म्हटलं जातं.