
आज आधार कार्ड आपल्यासाठी केवळ ओळखीचं दस्तऐवज राहिलेलं नाही, तर आर्थिक व्यवहार, सरकारी योजनांचा लाभ, मोबाईल नंबर लिंक करणं, बँकिंग व्यवहार यांसारख्या शेकडो कामांमध्ये त्याचा वापर अनिवार्य झाला आहे. पण, जिथे सोय वाढते, तिथे धोकेही वाढतात
कधी वाटलं आहे का, तुमच्या नावावर कुणीतरी कुठे तरी KYC केली असेल? किंवा आधार नंबरचा वापर करून कोणीतरी दुसरं काहीतरी काम केलं असेल? हे सगळं तुमच्या नकळत घडत असलं, तर?
UIDAI चं अधिकृत myAadhaar पोर्टल आता तुम्हाला घरबसल्या तुमच्या आधार वापराचा संपूर्ण इतिहास (Usage History) तपासण्याची सोय देतं. म्हणजेच, तुमचं आधार कार्ड कधी, कुठे, कोणत्या संस्थेकडून वापरलं गेलं – हे सगळं तुम्हाला पाहता येतं.
असे करा तुमच्या Aadhaar Usage History ची तपासणी
1. https://myaadhaar.uidai.gov.in/ या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
2. तुमचा 12 अंकी आधार नंबर आणि कॅप्चा टाका. मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगिन करा.
3. लॉगिन केल्यानंतर “Authentication History” या पर्यायावर क्लिक करा.
4. कोणत्या तारखेपासून तपासायचं आहे ते निवडा आणि “Submit” दाबा.
5. तुम्हाला यादी मिळेल की आधारचा वापर कधी, कुठे आणि कोणत्या प्रकारच्या प्रमाणीकरणासाठी झाला आहे.
तुम्हाला काही व्यवहार तुमच्या माहितीतले वाटत नसतील, किंवा पूर्ण अनोळखी वाटत असतील, तर तातडीनं UIDAI शी संपर्क करा:
1. हेल्पलाइन नंबर: 1947
2. ईमेल: help@uidai.gov.in
आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी अजून एक उपयुक्त पर्याय म्हणजे ‘बायोमेट्रिक लॉक’. तुम्ही तुमचे फिंगरप्रिंट आणि आयरिस डेटा तात्पुरते लॉक करू शकता, म्हणजे कुणीही त्याचा गैरवापर करू शकत नाही.