एक दंशातच हत्तीही होईल गारद, या सर्वात खतरनाक, विषारी सापाचं नाव काय ?
जगात सापांच्या अनेक प्रजाती आहेत. पण एक साप असा आहे ज्याच्या एका दंशाने हत्तीचाही मृत्यू होऊ शकतो. चला या सापाबद्दल अधिक जाणून घेऊयात.

साप हे जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहेत. पण त्यापैकी एक साप असा आहे जो केवळ त्याच्या आकारासाठीच नाही तर त्याच्या एका दंशाने मोठ्या प्रमाणात विष बाहेर काढण्यासाठी हा साप ओळखला जातो. या सापाला किंग कोब्रा असे म्हणतात. या किंग कोब्रा साप त्याच्या एका दंशात 500 मिलीग्राम पर्यंत विष बाहेर काढू शकतो. या प्रमाणात विष काही तासांत 20 लोकं किंवा एका मोठ्या हत्तीला मारण्यासाठी पुरेसे आहे. चला या सापाबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.
जगातील सर्वात लांब विषारी साप
किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. तो तीन ते चार मीटर पर्यंत वाढतो आणि क्वचित प्रसंगी हा साप 5.8 मीटरपेक्षा जास्त उंचीचा होतो ज्यामुळे त्याला पाहाताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. त्याचा रंग ऑलिव्ह हिरव्या ते गडद तपकिरी किंवा काळा असतो, बहुतेकदा हलके पट्टे देखील त्याच्या अंगावर असतात. जेव्हा त्याला धोका जाणवतो तेव्हा तो त्याच्या लांब, पातळ कणासह फना काढून ताठ उभा राहतो. त्याचे एक वैज्ञानिक नाव देखील आहे: ओफिओफॅगस, ज्याचा अर्थ साप खाणारा आहे. इतर साप उंदीर किंवा पक्ष्यांना शिकार करतात, तर किंग कोब्रा इतर सापांची शिकार करतो.
मोठ्या भक्ष्यासाठी बनवलेले विष
किंग कोब्रा मध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं विष आहे जे एकदम पॉवरफुल आहे. ते त्याच्या भक्ष्याच्या मज्जासंस्थेला बंद करते. एकदा या सापने एखाद्या व्यक्तीला दंश केला की त्याचे विष मेंदू आणि महत्वाच्या अवयवांमधील सिग्नल ब्लॉक करते. यामुळे व्यक्तीला लकवा मारू शकतो, त्यानंतर श्वसनक्रिया बंद पडते आणि हृदयविकाराचा झटका येतो.
बहुतेक सापांच्या उलट किंग कोब्रा एकाच दंशात मोठ्या प्रमाणात सामान्यतः 200 ते 500 मिलीग्राम दरम्यान विष सोडतो. या सापाने हत्तीच्या सोंडेला दंश केल्याने काही तासांतच हत्तीही मरण पावल्याचे अनेक उदाहरणे आहेत.
तर किंग क्रोबाचे विष केवळ प्राणघातकच नाही तर वैद्यकीयदृष्ट्या देखील खूप उपयुक्त आहे. संशोधकांनी किंग कोब्राच्या विषामध्ये ओहानिन नावाचे एक अद्वितीय प्रथिन शोधले आहे. ते वेदनाशामक म्हणून खूप फायदेशीर आहे. ते मॉर्फिनपेक्षा 100 पट जास्त प्रभावी असू शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)
