जगाच्या टॉप 100 यादीत स्थान मिळवणारे भारतीय आइस्क्रीम, जाणून घ्या कोणते शहर कोणत्या क्रमांकावर आहे
भारताचे आइस्क्रीम चवीनं जगाला भुरळ घालतेय! नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक टॉप 100 आइसक्रीम यादीत भारतातील काही शहरांच्या आइसक्रीम ब्रँड्सनी स्थान मिळवलं आहे. कोणत्या शहरानं कुठलं स्थान पटकावलं? चला जाणून घेऊया...

जगभरातील टॉप 100 आइसक्रीम्सच्या यादीत भारताच्या तीन देसी फ्लेवर्सना सलग दुसऱ्या वर्षी मानाचं स्थान मिळालं आहे. ही यादी केवळ गोडीची नाही, तर आपल्या देशाच्या खाद्यसंस्कृतीची ओळख जगभर पोहचवणारी एक अभिमानाची बाब ठरली आहे. भारतात आइसक्रीम ही केवळ थंड गोड डिश नसून, अनेकांच्या बालपणाच्या आठवणी, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधली खास वेळ आणि कुटुंबासोबतच्या मस्त क्षणांची गोष्ट असते. आणि याच देसी चवींनी आता जागतिक स्तरावर आपलं स्थान निर्माण केलं आहे.
22व्या क्रमांकावर – मँगो सँडविच (मुंबई)
मुंबईतील प्रसिद्ध ‘के रुस्तम अँड कंपनी’ या इराणी पारंपरिक आइसक्रीम पार्लरची ही खासियत म्हणजे इथे मिळणारं मँगो सँडविच. 1953 पासून चालत आलेलं हे ठिकाण अजूनही जुन्या मुंबईच्या चवीनं भरलेलं आहे. दोन नाजूक बिस्किट्सच्या मध्ये घट्ट मँगो आइसक्रीमचा थर असतो. एकदा का तो घशात गेला, की आपोआप आठवते ती पारंपरिक मिठास आणि सुट्टीतील दिवस. या खास चवेमुळे या आइसक्रीमने जगातील 100 सर्वोत्तम आइसक्रीम्सच्या यादीत थेट 22वा क्रमांक मिळवला आहे. मुंबईकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की त्यांचं आवडतं पारंपरिक ठिकाण आता जागतिक स्तरावरही ओळखलं जातं.
33व्या क्रमांकावर – गडबड आइसक्रीम (मंगळुरू)
कर्नाटकच्या मंगळुरू शहरातलं पब्बा रेस्टॉरंट हे एका खास डिशसाठी ओळखलं जातं गडबड आइसक्रीम. हे नाव ऐकूनच जसं उत्सुकता निर्माण होते, तसंच त्याचा स्वादही अनोखा आहे. एका उंच ग्लासमध्ये व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, जेली, कापलेले फळं, ड्रायफ्रूट्स आणि गोड सिरप अशा अनेक थरांतून बनलेली ही आइसक्रीम प्रत्येक चमच्याला वेगवेगळी चव देते. म्हणूनच ही आइसक्रीम केवळ डिश नाही, तर मंगळुरूच्या लोकांसाठी एक भावना आहे. या खास पद्धतीमुळे ही आइसक्रीम जागतिक यादीत 33व्या क्रमांकावर पोहोचली आहे.
40व्या क्रमांकावर – टेंडर कोकोनट (मुंबई)
ही आइसक्रीम 1984 साली मुंबईच्या जुहू येथून सुरू झाली. टेंडर कोकोनट आइसक्रीमची खासियत म्हणजे ती शुद्ध आणि नैसर्गिक आहे. यात वापरला जातो ताजा नारळाचा गर कोणतेही कृत्रिम रंग, फ्लेवर किंवा केमिकल नसतात. म्हणूनच तिचा स्वाद असतो अगदी शुद्ध आणि आरोग्यदायी. नैसर्गिक गोडी आणि देसी स्टाईलमुळे या आइसक्रीमने जगातील टॉप 100 आइसक्रीम्समध्ये 40व्या स्थानावर आपली जागा मिळवली आहे. ‘नेचरल’ म्हणजे खरंच नेचरल, हेच जगाने मान्य केलं आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर…
भारताच्या या तीन आइसक्रीम्सनी आपला देश जगभरात नावारूपाला आणला आहे. पारंपरिक पद्धती, देसी चव आणि लोकांच्या भावना यामुळेच ही आइसक्रीम्स केवळ खाद्यपदार्थ नसून एक अनुभव ठरतात. आज या चवींनी जागतिक यादीत आपली ओळख निर्माण केली आहे, आणि हे आपल्या देशासाठी गौरवाचं क्षण आहे. अशा चवींना प्रोत्साहन देणं हे फक्त चवबदल नाही, तर आपल्या संस्कृतीचं जतन करणं आहे.
