पुणेकरांच्या सेवेत 25 ई-बस दाखल

पुणेकरांच्या सेवेत 25 ई-बस दाखल

पुणे : पुणेकरांच्या सेवेत आजपासून इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत  पीएमपीकडून 25 इलेक्ट्रिक बसची खरेदी करण्यात आली असून, नुकतीच त्यांची चाचणी घेण्यात आली होती. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. पहिल्या टप्प्यात या 25 बस पुण्यातील 3 मार्गांवर आणि पिंपरी चिंचवडच्या चार मार्गांवर धावणार आहेत. या बसमुळे प्रदूषण कमी होऊन पुणेकरांचा प्रवास प्रदूषणमुक्त होणार आहे.

पीएमपीने 25 इलेक्ट्रॉनिक बस खरेदी केल्या आहेत. या बसची चाचणी काही महिन्यांपूर्वी घेण्यात आली होती. आज  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. या बस संपूर्ण इलेक्ट्रॉनिक असून यामुळे प्रदूषण रोखले जाणार आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात 500 ई-बस खरेदी करण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या टप्यात शहरात 25 बस धावणार आहेत. नव्याने येणाऱ्या ई-बस दोन्ही महापालिका हद्दीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ई- बस चार्ज करण्यासाठी भेकराईनगर आणि निगडी डेपो येथे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी या बस चार्ज करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

पुण्यातील मल्टीमोडल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब चे भूमिपूजन तसेच स्मार्ट इलेक्ट्रिक बस प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, मानवसंसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे,  महापौर मुक्ता टिळक, पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे आदी उपस्थित होते.

पुण्यासाठी घेतलेले सर्व निर्णय प्रगतीपथावर : मुख्यमंत्री

“शहरात सर्व सुविधा मिळायला हव्यात, हे लक्षात घेऊन स्मार्ट सिटी मिशन सुरू केले. पुण्यासाठी घेतलेले सर्व निर्णय प्रगतीपथावर आहेत. मेट्रोचं काम लवकर पूर्ण होईल याची मला खात्री आहे. पुणे हे वाहनांचा आगार झाले आहे. वाहनांच्या संख्येमुळे प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण असंच वाढत राहिले तर पुणे हे सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जाऊ लागेल. म्हणून सार्वजनिक वाहतूक महत्वाची आहे. आणि त्यासाठी इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टिम तयार करण्यात येत आहे.”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“पुण्यात मेट्रो चं जाळ निर्माण होत आहे. पाच मिनिटांहून अधिक वेळ बसची वाट पाहावी लागली नाही तरच लोक बसने प्रवास करतील. त्यामुळे येत्या काळात पाच मिनिटात बस उपलब्ध होईल.पीएमपी ने 1500 बस पारदर्शक पद्धतीने खरेदी केल्या आहेत. नॉन-एसीच्या भाड्यात पुणेकरांना एसी बसने फिरता येणार आहे. स्वारगेट मध्ये सर्व प्रकारच्या ट्रान्सपोर्ट सिस्टिमला सामावून घेण्यासाठी इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब उभे राहणार आहे. सिंगल आप आणि सिंगल तिकीट यंत्रणा उभी करायची आहे.”, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मार्ट सिटी मिशन सुरू केले. त्या मिशन संदर्भात पुण्यासाठी घेतलेले सर्व निर्णय प्रगतीपथावर आहे. तसेच त्या मिशनमधील एक महत्वाचा घटक असलेली पुण्याच्या मेट्रोचे काम देखील प्रचंड वेगात सुरु आहे. त्यामुळे पुणेमेट्रो वेळे आधी सुरू होईल” असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI