अभिनेत्री नगमाच्या सावत्र भावाकडून पुण्यात इराणी गर्लफ्रेण्डचा छळ

अभिनेत्री नगमाच्या सावत्र भावाकडून पुण्यात इराणी गर्लफ्रेण्डचा छळ

पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री आणि काँग्रेसच्या नेत्या नगमा यांच्या सावत्र भावाने त्याच्या इरणी गर्लफ्रेण्डचा भयंकररित्या मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. पुण्यातील बाणेर पाषाण रोडवरील राहत्या घरात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मानसिक छळासोबत शारीरिक छळही नगमा यांच्या सावत्र भावाने केल्याचा आरोप आहे. धनराज मोरारजी असे नगमा यांच्या भावाचे नाव आहे. इराणच्या तेहराण शहरातील परवीन रझा घेलीची या महिलेला घरात कोंडून धनराज मोरारजी याने मारहाण केली. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला, असे आरोप धनराज मोरारजीवर करण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी धनराजसोबत परवीनची मैत्री झाली होती. त्यानंतर पुण्यात एकत्र राहत होते.

निर्दयी धनराज मोरारजीकडून परवीनचा छळ

परवीन रझा घेलिची ही 30 वर्षांची असून, मूळची इराणमधील तेहराण शहरातील आहे. सध्या पुण्यातील बाणेर पाषाण रोडवरील बंगल्यात ती राहते. इराणमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉम्प्युटर डिप्लोमा करण्यासाठी स्टुडंट व्हिसा घेऊन परवीन पुण्यात आली. कॉम्प्युटर क्लास सुरु असताना कॉमन मैत्रिणीच्या ओळखीतून धनराज मोरारजीशी तिची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं.

धनराज आणि परवीन पुण्यात एकत्र राहू लागले. सुरुवातील धनराजने परवीनला चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर किरकोळ भांडणांवरुन परवीनला धनराज मारहाण करु लागला. परवीनच्या हातावर आणि मानेवर सिगारेटचे चटकेही धनराजने दिले. परवीन घरातून निघून जाण्याचा प्रयत्न करु लागली, तेव्हा धनराजने तिच्या गळ्याला चाकू लावून मारहाण केली. पश्चाताप झाल्याचे सांगून माफी मागत असे. मात्र, पुन्हा सारखेच वागत असे. आठवड्यातून दोनवेळा तरी मारहाण करत असे. घराबाहेर गेल्यास परवनीचा व्हिसा, पासपोर्ट घेऊन जाई.

एकेदिवशी घरात कोंडून, दोन कुत्रे रुममध्ये सोडले आणि परवनीला धनराजने प्रचंड त्रास दिला. त्यानंतर इन्स्टाग्रामवरुन परवीनने तिची मैत्रीण परदाद पेदराम हिला मेसेज केला आणि मदतीची याचना केली. त्यानंतर परवीनची मैत्रीण पोलिसांना घेऊन रुमवरा दाखल झाली आणि धनराजच्या जाचातून परवनीची सुटका करण्यात आली.

धनराज मोरारजीला अटक

दरम्यान, परवीनची मैत्रीण परदाद पेदराम आणि पत्रकार अर्चना मोरे यांच्या मदतीने परवीनची सुटका झाली. दरम्यान, धनराजला अटक करण्यात आली असून, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI