ऐतिहासिक झेप घेतोय, निवडणूक लढवतोय : आदित्य ठाकरे

सचिन पाटील

Updated on: Sep 30, 2019 | 6:45 PM

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Worli Vidhansabha) यांनी अखेर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.

ऐतिहासिक झेप घेतोय, निवडणूक लढवतोय : आदित्य ठाकरे

मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Worli Vidhansabha) यांनी अखेर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. मी निवडणूक लढवणार अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी वरळीतील शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली. वरळी हा माझा मतदारसंघ असला, तरी संपूर्ण महाराष्ट्र हा माझ्यासाठी मतदारसंघ असेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले

ही माझ्यासाठी ऐतिहासिक झेप आहे. ही मी सुरुवात करत आहे, त्याआधी मी 10 वर्षांपासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आता निवडणूक लढवत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

आदित्य ठाकरे म्हणाले, “मी पक्षप्रमुखांची परवानगी घेतली आहे. आता तुम्हा सर्वांची परवानगी असेल तर सर्व महापुरुषांच्या साक्षीने मी निवडणूक लढवणार अशी घोषणा करतो.” या घोषणेनंतर उपस्थितांनी प्रचंड जल्लोष करत आदित्य ठाकरेंच्या घोषणेचं स्वागत केलं.

आपण सर्वांनी जे प्रेम दिलं त्यासाठी सर्वांचे आभार. माझ्यासाठी हा ऐतिहासिक टप्पा आहे. मी ही झेप घेतो आहे यात मला काळजी नाही. कारण आपण मला सांभाळण्यास आहात हे माहिती आहे. हे प्रेम आशिर्वाद असेच राहू द्या.

मी आत्ता निवडणूक लढवण्याचा निर्णय तुमच्या आशिर्वादामुळे घेतला. जसा वरळीचा विकास करायचा आहे तसा महाराष्ट्रालाही पुढे न्यायचं आहे. माझा मतदारसंघ वरळी असला तरी संपूर्ण महाराष्ट् ही माझी कर्मभूमी आहे. म्हणूनच माझ्यासाठी वरळीत प्रचार होत असताना प्रचारातील खर्चही सांगा. फक्त वरळीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करायचा आहे. महाराष्ट्रात कुठेही शिवसेनेला पडलेलं मत माझ्यासाठीचं असणार आहे.

शिवसैनिक म्हटलं की जसं प्रेम व्यक्त करतात तसा रागही व्यक्त करु शकतात. त्यामुळे वरळीतून माझ्याविरोधात कुणीही उभं राहण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उभं राहू द्या. त्यांना आरामात, आनंदात लढू द्या. आपण आपलं काम करु आणि जिंकू.

शिवसेनेच्या परिवाराला माझी विनंती आहे. मी मागील काही काळात महाराष्ट्र पिंजून काढला. त्यात लोकांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. जर कधी लोकांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला नाही, तर तो आवाज तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा. वरळीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास करेन. माझ्यासाठी महाराष्ट्र ही कर्मभूमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेला मतदान झालं पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

जनआशिर्वाद यात्रेमुळे 40 मिनिटे बोलण्याची सवय लागली, मात्र आज काय बोलावं हे कळत नाही. आई माझ्यामागे बसली आहे. हीच वेळ आहे कर्जमुक्त, सुशिक्षित, भगवा महाराष्ट्र बनवण्याची. शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याची हीच वेळ आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांना तुम्ही तयार आहात का असा प्रश्नही विचारला. यावर उपस्थितांनी आदित्या ठाकरेंना उत्स्फूर्त प्रतिसाद देत होकार दिला.

आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

मी जनतेचे आभार मानण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा केली. राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी मी लोकांच्या मनातील भावना ओळखण्याचा प्रयत्न केला. शिववसैनिक म्हणून काम करतांना आनंद. शिवसेनेच्या स्टाईलमध्ये काम करायचं आहे, मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे, असं  आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी आई रश्मी ठाकरे,भाऊ तेजस ठाकरे ही उपस्थित होते. हा ऐतिहासिक क्षण आहे. वरळीचा विकास करणारच, पण महाराष्ट्र माझा ध्यास आहे. आमदार सुनील शिंदे आणि सचिन आहिर यांचं आभार. मला मुख्यमंत्री बनायचे आहे म्हणून मी निर्णय घेतलेला नाही मला महाराष्ट्राचं भले करायचे आहे. हीच ती वेळ आहे बेरोजगारी, कर्ज मुक्ती करण्याची, नवा महाराष्ट्र घडवायची, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI