Hathras Case: पीडितेचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली; गाव सोडण्याच्या मनस्थितीत

आम्हाला आरोपींचे नातेवाईक आणि पंचायतीची भीती वाटते.

Hathras Case: पीडितेचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली; गाव सोडण्याच्या मनस्थितीत

मेरठ: हाथरस बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण अजूनही तापलेलेच आहे. अशातच आता पीडितेचे कुटुंबीय मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. मुलीसोबतच्या दुर्दैवी घटनेनंतर हे सर्वजण गाव सोडण्याचा विचार करत आहेत. आपल्याला गावच्या पंचायतीची भीती वाटत आहे. आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे, अनेक धमक्याही येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे योगी सरकारने सर्व सुरक्षा पुरवूनही पीडितेच्या कुटुंबीयांना इतकी दहशत का वाटत आहे, असा सवाल आता निर्माण झाला आहे. (Hathras victim’s family Living in fear)

सध्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या घराबाहेर पोलिसांचा २४ तास पहारा आहे. याशिवाय, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. घरात येणाऱ्या प्रत्येकाची मेटल डिटेक्टरने तपासणीही केली जाते. तरीही पीडितेच्या कुटुंबीयांना स्वत:च्या सुरक्षेची खात्री वाटत नाही.

या घटनेवरून राजकारण तापलेले असल्याने सध्या पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी नेत्यांची रीघ लागली आहे. आरोपींच्या बाजूने असलेले लोक या नेत्यांना विरोध करत आहेत. यापूर्वी भीम आर्मीच्या चंद्रशेखर यांना धमकी देण्यात आली होती. तर पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला आलेले ‘आप’चे खासदार यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.

या सगळ्या वातावरणामुळे भविष्यात आपले काय होणार, याची काळजी पीडितेच्या कुटुंबीयांना वाटू लागली आहे. त्यामुळे हे कुटुंब गाव सोडण्याचा विचार करत आहे. आम्हाला आरोपींचे नातेवाईक आणि पंचायतीची भीती वाटते. अशा परिस्थितीत गावात राहणे ठीक नाही. सरकारने आम्हाला शहरात जागा दिली तर आम्ही तिकडे जाऊन राहू, असे पीडितेच्या भावाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांना असलेला धोका लक्षात घेता राज्य सरकारने हाथऱसमधील सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. घरात येणाऱ्यांना त्यांची नोंद करणे बंधनकारक आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या संरक्षणासाठी प्रत्येकी दोन-दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, गावात एक सीओ, तीन पोलीस निरीक्षक आणि १५ पुरुष आणि सहा महिला कॉन्स्टेबल बंदोबस्तावर आहेत.

संंबंधित बातम्या:

राजस्थानातही बलात्कार झाला, मग राहुल गांधी तिकडे का गेले नाहीत?- आठवले

Hathras case: जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून 100 कोटींचा निधी, ED चा दावा

(Hathras victim’s family Living in fear)

Published On - 6:38 pm, Wed, 7 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI