लग्नानंतर देवदर्शनाला गेलेली नवरी प्रियकरासोबत पळाली

लग्नानंतर नवऱ्यासोबत देवदर्शनाला गेल्यानंतर चक्क नवविवाहिता प्रियकरासोबत पळून गेली. अहमदनगर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली.

लग्नानंतर देवदर्शनाला गेलेली नवरी प्रियकरासोबत पळाली

अहमदनगर : लग्नानंतर नवऱ्यासोबत देवदर्शनाला गेल्यानंतर चक्क नवविवाहिता प्रियकरासोबत पळून गेली. अहमदनगर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. अवघ्या तीन दिवसांपूर्वी लग्न झालेलं दाम्पत्य देवदर्शनासाठी मढी कानिफनाथला गेले होते. त्यावेळी तिथे प्रियकर दबा धरुन बसला होता. नवरा पार्किंगमधील गाडी काढण्यासाठी गेल्याची संधी साधून नवी नवरी प्रियकरासोबत पळून गेली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका तरुणाचा तीन दिवसापूर्वी विवाह झाला होता. लग्नकार्य आटोपून नव दाम्पत्य देवदर्शनाला गेलं होतं. मात्र नवरीचं आधीच एका मुलासोबत प्रेमप्रकरण असल्याचा दावा आहे. नवदाम्पत्य मढी कानिफनाथला देवदर्शनाला गेल्यानंतर, नवरदेवाने आपली गाडी पार्किंगमध्ये लावली होती. देवदर्शन आटोपल्यानंतर तो गाडी पार्किंमधून काढण्यासाठी गेला. ही संधी तिथे आधीच आलेल्या नवरीच्या प्रियकराने साधली. त्याने आपल्या विवाहित प्रेयसीला बाईकवर बसवून धूम ठोकली.

हा सर्व प्रकार देवस्थानच्या cctv कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पार्किंगमधून गाडी काढण्यासाठी गेलेल्या नवरदेवाला आपली बायको न दिसल्याने त्याची एकच तारांबळ उडाली. बायको नेमकी कुठे गेली, याची त्याने शोधाशोध केली. त्यावेळी मंदिराचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता, पती पार्किंगमध्ये गाडी घेण्यासाठी जातो त्यावेळी दुसरीकडे प्रियकर गाडी घेऊन तयार असल्याचं दिसतं. याच संधीचा फायदा घेत नववधू आपल्या प्रियकरासोबत पलायन करताना या cctv फुटेच मध्ये स्पष्ट दिसत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI