साताऱ्यात भोंदूबाबाचा शहीद जवानाच्या कुटुंबाला गंडा, ‘अंनिस’कडून पर्दाफाश

करणी झाल्याची बतावणी करत ती काढून देतो असं म्हणत साताऱ्यात एका भोंदूबाबाने थेट शहीद जवानाच्या कुटुंबियांनाच लाखो रुपयांना गंडा घातला आहे (ANIS expose fraud baba in Satara).

साताऱ्यात भोंदूबाबाचा शहीद जवानाच्या कुटुंबाला गंडा, 'अंनिस'कडून पर्दाफाश
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Mar 15, 2020 | 10:54 AM

सातारा : करणी झाल्याची बतावणी करत ती काढून देतो असं म्हणत साताऱ्यात एका भोंदूबाबाने थेट शहीद जवानाच्या कुटुंबियांनाच लाखो रुपयांना गंडा घातला आहे (ANIS expose fraud baba in Satara). गणेश विठोबा शिंदे असं या भोंदूबाबाचं नाव आहे. त्याने करणी काढून देण्याच्या आणि सोन्यात गुंतवलेले पैसे दुप्पट करण्याचं अमिष दाखवलं. अशाच प्रकारे त्यांनी इतर पीडित कुटुंबियांचीही 21 लाख रुपयांची फसवणूक केली. पीडित कुटुंबानी अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे (अंनिस) धाव घेतली. यानंतर अंनिसने भोंदूबाबाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत वाई पोलिसांनी शनिवारी (14 मार्च) गुन्हा दाखल केला आहे. यानंतर गुन्हे शाखेनं समांतर तपास करत 12 तासांत या भोंदूबाबाला अटक केली.

आरोपी भोंदूबाबाने शहीद जवानाची पत्नी आणि आई या दोघींना वेगवेगळं गाठून त्यांना एकमेकांविरुद्ध भडकावलं. सुन सासूविरुद्ध आणि सासू सुनेविरुद्ध करणी करत असल्याचं सांगितलं. तसेच ही करणी काढून देण्यासाठी त्यांच्याकडून 2 लाख रुपये उकळले. त्यामुळे शहीद जवानांच हे कुटुंब आर्थिक पातळीवर चांगलंच नाडलं गेलं. आरोपी भोंदूबाबाने अशाचप्रकारे नोकरी लावण्याचं आमिष दाखवून सातारा आणि मुंबई परिसरातील अनेकांना गंडा घातल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

आरोपी गणेश शिंदे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात चांदवडी येथे राहतो. त्याने अघोरी विद्या येत असल्याचं सांगत अनेक लोकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढलं आणि त्यांची आर्थिक लूट केली. नोकरी लावणे, सोने दुप्पट करुन देणे अशी आमिषं दाखवून त्याने अनेकांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे त्यांने आपली केंद्रातील मोठ्या मंत्र्यांकडे ओळख असून तुम्हाला सरकारी नोकरी लावून देण्याचंही आमिष देत फसवणूक केली. आरोपीने पीडितांना पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही तक्रार आहे.

वाईतील संपूर्ण कुटुंबालाच मृत्यूची भीती दाखवत गंडा

वाई तालुक्यातील आणखी एका पीडित कुटुंबालाही आरोपीने असंच फसवलं. हे कुटुंब एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन आरोपी गणेश शिंदेकडे गेले. त्याने या पीडितेला अघोरी विधी करण्यास सांगितलं. तसेच हा विधी न केल्यास पत्नीला मृत्यू येईल, अशी भीती घातली. विधीच्या बहाण्याने आरोपीने पीडित कुटुंबियांच्या घरी जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र भेट घेत घराची माहिती गोळा केली. या माहितीचा उपयोग करुन त्याने घरातील प्रत्येकाला दुसऱ्या सदस्याचा मृत्यू होईल, त्यामुळे विधी करणं आवश्यक आहे अशी भीती दाखवली.

या कुटुंबातील दुसऱ्या नवविवाहित जोडप्यातील पतीलाही तुझ्या पत्नीचा मृत्यू होईल, तसेच तुझ्या होणाऱ्या अपत्याचा जन्माआधी मृत्यू होईल अशी भीती दाखवली. या नवविवाहित जोडप्यातील पत्नीला तुमचा पती 6 महिन्यांमध्ये जोगत्या होईल. तुमच्या पुढील 7 पिढ्याही तृतीयपंथीय म्हणून जन्माला येतील अशी भीती दाखवली. त्यामुळे हे कुटुंबीय प्रचंड घाबरलं. याचा फायदा घेत आरोपीने त्यांच्याकडून अघोरी विधीसाठी 8 लाख रुपयांची मागणी केली. हा विधी केला नाही तर 8 दिवसांमध्ये पतीचा मृत्यू होईल, असंही सांगितलं. त्यामुळे या कुटुंबाने कर्ज काढून आणि व्याजाने पैसे उसने घेऊन आरोपी भोंदूबाबाला दिले. यानंतर आरोपीने पीडित कुटुंबाला 5 लाख रुपयांचा दैवी ताईत दिल्याचा दावा केला. या व्यतिरीक्त करणी काढण्यासाठी आरोपीने या कुटुंबाकडून सुमारे 12 लाख रुपये उकळले.

“आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करा”

आरोपीने मोठी रक्कम दिल्याने पीडित कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली. त्यानंतर आरोपीने या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करण्यास सांगितलं. तसेच त्यासाठी मुंबईतील फ्लॅट आणि गावाकडील घर गहाण ठेवून पैसे आणण्यास सांगितलं. ही गुंतवणूक केल्यानंतर एका महिन्यात पैसे परत देऊन घर सोडवता येईल, असंही आश्वासन पीडितांना दिलं. याला आमिषाला भुलून पीडित कुटुंबाने आरोपी भोंदूबाबाला 9 लाख 50 हजार रुपये दिले. मात्र एका महिन्याने त्याच्याकडे पैशांची मागणी करताच त्याने उडवाउडवी केली. जास्तच मागे लागल्यानंतर त्याने पीडित कुटुंबाला 14 लाख 65 हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र नंतर तो धनादेशही खोटा असल्याचं उघड झालं. यानंतर पीडित कुटुंबाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल केली. समितीने कुटुंबीयांना घेऊन वाई पोलीस ठाणे गाठले.

याप्रकरणी अंनिसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, नितीन हांडे, वाई शाखेचे रणवीर गायकवाड, अतुल पाटील, दिलीप डोंबिवलीकर, अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, सातारा अंनिसचे भगवान रणदिवे, डॉ. हमीद दाभोळकर यांनी विशेष प्रयत्न केले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही या प्रकरणात विशेष लक्ष घालून पीडितांची तक्रार समजून घेतली. तसेच पोलिस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. यानंतर गुन्हे शाखेने (LCB) प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी भोंदूबाबाला तात्काळ अटक केले.

यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) अशाप्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास पीडितांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पीडितांना पूर्ण मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

ANIS expose fraud baba in Satara

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें