कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही, याची काळजी घेऊ : बाळासाहेब थोरात

कृषी विधेयक महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत मांडली (Balasaheb Thorat on Agriculture Bills).

कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही, याची काळजी घेऊ : बाळासाहेब थोरात

मुंबई : लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये कृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर आज (27 सप्टेंबर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. मात्र, हे विधेयक महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत मांडली (Balasaheb Thorat on Agriculture Bills).

“कृषी विधेयकाला आम्ही विरोध केला आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलनदेखील करत आहोत. या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील विरोध केला आहे. शिवसेनेचं मतदेखील तेच आहे. पण आम्हाला हा विधेयक लागू करण्याबाबत स्ट्रॅटेजी ठरवायची आहे. त्यासाठी आम्हाला एकत्र बसून चर्चा करावी लागेल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत तो कायदा लागू होऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले (Balasaheb Thorat on Agriculture Bills ).

“केंद्राचा नवा कायदा कृषी उत्पन्न बाजार समितीला संपवणारा आहे. नव्या कायद्यात व्यापाऱ्याला मुक्तपणे परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळेल याची हमी या कायद्यात देण्यात आलेली नाही, ती हमी कृषी उत्पन्न बाजार समितींची होती”, असं थोरात यांनी सांगितलं.

“आधारभूत किंमतीत धान्य खरेदीत कृषी उत्पन्न बाजार समितीत महत्त्वाची भूमिका होती. केंद्राच्या कृषी कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती संपेल. त्याचबरोबर आधारभूत किंमत मिळवण्यासाठी जी व्यवस्था निर्माण केली आहे तीदेखील संपून जाईल”, असं मत थोरात यांनी मांडलं.

“काँग्रेसवर दुटप्पीपणाचा आरोप होतो. पण आमच्या जाहीरनाम्यात आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती बळकट करण्यासंबंधी आणि शेतकऱ्यांना जास्त फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करु असं म्हटलं होतं. जाहीरनाम्यात आम्ही तालुका पातळीवरील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची आणखी काही शाखा स्थापन करुन बाजार समितींना आणखी बळकट करु, असं नमूद केलं होतं”, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

“काँग्रेस ही शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे. शेतकऱ्याला चार पैसे मिळावे, कृषी उत्पन्न बाजार समितीला आणखी मजबूत करावं, या दृष्टीनेच आम्ही विचार करत आहोत”, असं थोरात म्हणाले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीवरदेखील प्रतिक्रिया दिली. “संजय राऊत हे एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. त्यांच्या भेटीला महत्त्व देऊ नये. दोन वेगळे पक्षाचे नेते भेटू शकतात. त्यात काही विशेष नाही. आपण या भेटीला विनाकारण महत्त्व देतोय”, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

तृणमूल खासदाराने नियम पुस्तक फाडले, वेलमध्ये काँग्रेस-आपचा गोंधळ, राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI